Tue, Apr 23, 2019 08:24होमपेज › Sangli › चोर्‍या, लूटमारीच्या घटनांमुळे रेल्वे प्रवास असुरक्षित

चोर्‍या, लूटमारीच्या घटनांमुळे रेल्वे प्रवास असुरक्षित

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 11:00PMमिरज : जे. ए. पाटील

रेल्वेचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित मानला जातो. परंतु गेल्या काही वर्षांपासून रेल्वे गाड्यांत चोर्‍या आणि दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा प्रवास आता असुरक्षित वाटू लागला आहे. रेल्वेत कोणीही यावे अन् लुटावे, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांची सुरक्षा आता रामभरोसे झाली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरील दक्षिण महाराष्ट्रात असलेले मिरज हे रेल्वे वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे. मध्य रेल्वे आणि दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या अनेक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या मिरजमार्गे पुणे,मुंबईसह राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली आणि दक्षिणेकडे गोवा, हुबळी, बंगळुरू आणि तामिळनाडू राज्यात धावतात.  या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल तैनात आहे. मिरज येथे निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांची नेमणूक आहे. पोलिस व आरपीएफ यांचे स्वतंत्र ठाणे आहे.  गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर आणि सातारा रेल्वे सुरक्षा बलचे स्वतंत्र ठाणे निर्माण करण्यात आले आहे. तसेच रेल्वे पोलिस ठाण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. 

सुरक्षा यंत्रणा मजबूत असतानाही रेल्वेतील चोर्‍या आणि दरोड्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. मिरज-पुणे दरम्यान सातारा व पुणे जिल्ह्यातील सालपे, आदर्की, लोणंद, जेजुरी ही स्थानके रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असल्याने सर्वात असुरक्षित आहेत.पुण्यातून मध्यरात्री मिरज, कोल्हापूर आणि हुबळी, बंगळुरूकडे जाणार्‍या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांचे मौल्यवान जिन्नस असलेल्या बॅगांची चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. मध्यरात्री प्रवासी झोपेत असतात. सातारा-मिरज दरम्यान त्यांना जाग आल्यानंतर बॅगांची चोरी झाल्याचे लक्षात येते.

गाड्यांतील चोर्‍यांबरोबरच गेल्या काही वर्षांत रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नची वायर कापून बिघाड निर्माण केला जातो. दरोडेखोरांच्या टोळक्यांकडून प्रवाशांना मारहाण करुन लुटण्याच्या घटना वाढत आहेत. घटना घडल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षा व्यवस्था वाढविली जाते. परंतु पुन्हा सुरक्षा व्यवस्था आणि गस्त कमी केली जाते.कोल्हापूर, मिरज, सातारा आरपीएफकडे ठराविक गाड्यांसाठी बदोबस्त आहे. रेल्वे पोलिस ठाण्याकडे मिरज-कोल्हापूर आणि मिरज-लोणंद आणि मिरज-जतरोड, मिरज-विजयनगर स्थानकापर्यंत रेल्वे मार्गाचे कार्यक्षेत्र आहे.

मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात कोल्हापूर-मिरज, लोणंद-मिरज, पंढरपूर आणि बेळगाव मार्गावर घडलेल्या घटनांच्या नोंदी होतात. मात्र या पोलिस ठाण्यात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने तपास कामावर मर्यादा येतात. आता नव्याने कोल्हापूर, सातारा आणि पंढरपूर या ठिकाणी नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही पोलिस ठाणे जानेवारी 2019 पासून कार्यान्वित होणार आहेत. नवीन पोलिस ठाणीलवकर कार्यान्वीत होऊन पोलिसांची संख्या वाढविण्याची गरज आहे. रेल्वेस्थानक आणि धावत्या गाडीमध्ये बंदोबस्त असतानाही चोर्‍या आणि लूटमारीचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढतेच आहे. मिरज-पुणे मार्गावर काही ठराविक गाड्यांनाच बंदोबस्त असतो. काहीवेळा तो अपुरा असतो. ज्या गाडीस बंदोबस्त नाही, ती गाडी हेरुन सिग्नलमध्ये बिघाड निर्माण करुन लूटमारीचे प्रकार होतात.  प्रवाशांच्या ऐवजाची अचूक माहिती दरोडेखोर किंवा चोरट्यांना कशी मिळते हा प्रश्‍नच आहे. रेल्वेत कोणीही यावे, विनापरवाना धंदा करावा, आणि पैसे कमवावेत अशी स्थिती आहे. या व्यावसायिकांकडे सुरक्षा यंत्रणेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. या अनधिकृत व्यावसायिकांना आळा कोण घालणार आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे रेल्वेचे लक्ष कधी जाणार असा सवाल आता विचारला जातो आहे. मिरज रेल्वेस्थानकात येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि संशयित वस्तूंच्या शोधासाठी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्कॅनिंग मशिन बसविण्यात आले आहे. परंतु ते गेले चार महिने बंद आहे. रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांचा नेहमी बंदोबस्त असतो. परंतु चोरीच्या घटना कशा घडतात असा प्रवाशांचा प्रश्‍न आहे. पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडून वेळोवेळी कारवाईही होते आणि वारंवार घटनाही घडतात. असा योगायोग मिरज स्थानकात पहावयास मिळतो.

रेल्वे प्रशासन हतबल आहे का?

रेल्वेत अवैध खाद्यपदार्थ विक्रेते आणि आरक्षित तिकीटाचा काळाबाजार करणार्‍यांनी  अड्डाच बनविला आहे. या व्यावसायीकांच्या माध्यमातून दरमहा लाखो रुपयांची उलाढाल होते. रेल्वे स्थानकात तसेच गाडीमध्ये रेल्वे नियमांचा भंग करणार्‍या प्रवाशांवर तसेच प्लॅटफार्म तिकीट नाही म्हणून दंड आकारला जातो, शिक्षा केली जाते. परंतु अवैध व्यावसायिकांना  मात्र रेल्वेचा कोणताही नियम लागू नाही का, असा प्रश्‍न आहे. स्टेशन अधीक्षकांनी अनेकवेळा सुरक्षा यंत्रणेला अवैध व्यावसायिकांचा बंदोबस्त करण्याबाबत पत्र दिले. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. केराची टोपली दाखवली जाते. दरमहा काही जणांवर कारवाई केल्याचे दाखविले जाते. मात्र याचा व्यावसायिकांवर कोणताही परिणाम होताना दिसून येत नाही. रेल्वेत अवैधरित्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची आणि सराईत गुन्हेगारांची दहशत चालते. त्यांच्यापुढे रेल्वे प्रशासन हतबल बनले आहे का असा सवाल विचारला जातो.