Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Sangli › रेल्वे अधिकारी-खा. शेट्टी यांची खडाजंगी

रेल्वे अधिकारी-खा. शेट्टी यांची खडाजंगी

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 11:23PMमिरज : प्रतिनिधी

मिरज-पुणे रेल्वेमार्गावर भवानीनगर येथे गावकर्‍यांच्या सोयीसाठी रेल्वे रुळाखालून रस्ता करावा, अशी मागणी आहे. या विषयावरून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात बुधवारी खडाजंगी झाली. गावकर्‍यांची मागणी पूर्ण न झाल्यास रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम भवानीनगर येथे बंद पाडण्याचा इशारा  खा. शेट्टी यांनी यावेळी दिला.

शर्मा सातारा-कोल्हापूर या रेल्वेमार्गाच्या तपासणीकरिता आले होते. शेट्टी यांच्यासह विविध प्रवासी संघटनांनी त्यांची भेट घेऊन निवेदने दिली.  शेट्टी यांनी भवानीनगर येथे गावकर्‍यांना त्यांच्या शेताकडे जाण्याकरिता भुयारी रस्ता करून द्यावा, अशी मागणी केली. गेल्या अनेक वर्षांच्या या मागणीकडे  रेल्वेकडून  दुर्लक्ष झाल्याचे  शेट्टी यांनी सांगितले.

महाव्यवस्थापक  शर्मा म्हणाले, या रस्त्याचा प्रश्‍न आमच्या अखत्यारीत येत नाही. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन घ्यावा व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा.    

त्यामुळे शर्मा व  खा. शेट्टी यांच्यात वादावादी झाली. शेट्टी यांनी अधिकार्‍यांना चांगलेच खडेबोल सुनावले. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते  यांच्यातही बराच वाद झाल्याने वातावरण तणापूर्ण बनले होते. रेल्वे अधिकार्‍यांच्या वागणुकीबद्दल खा. शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. 

रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे, सचिव सुकुमार पाटील, रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष किशोर भोरावत,  संदीप शिंदे,  ज्ञानेश्‍वर पोतदार आणि रेल्वे प्रवासी संघाचे अल्लाबक्ष काझी यांनी विविध मागण्यांचे निवेदन शर्मा यांना दिले.  दीपक शिंदे, अजिंक्य हंबर, गजेंद्र कल्लोळी, वाय. सी. कुलकर्णी, पांडुरंग कोरे इत्यादी उपस्थित होते.

मध्य रेल्वेचे मिरज येथे  स्वतंत्र डिव्हीजन सुरू करावे, पीटलाईन लांबी व संख्या वाढवून पुण्याहून सुटणार्‍या झेलम एक्स्प्रेससह अन्य गाड्या मिरजेतून सोडाव्यात, कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेसचा विस्तार हैद्राबादपर्यंत करावा, मिरज-गुलबर्गा, मिरज-विशाखापट्टणम नवीन एक्स्प्रेस सुरू करावी,  कोयना एक्स्प्रेसला विश्रामबाग येथे थांबा देण्यात यावा व मिरज-कोल्हापूर दरम्यान लोकल  सुरू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

शर्मा यांनी रेल्वे स्थानकातील विविध विभागांची पाहणी केली. प्लॅटफार्म क्र. 3 वरील काँक्रीटीकरणाच्या कामाचे तसेच क्रेन शेडचे उद्घाटन करण्यात आले. पीट लाईनचीही पाहणी केली.  पुणे विभागाचे रेल प्रबंधक मिलिंद देऊसकर, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक के.एस.पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.