Mon, Apr 22, 2019 16:15होमपेज › Sangli › आयर्विन पुलाच्या ओव्हरहेडला जीपची धडक

आयर्विन पुलाच्या ओव्हरहेडला जीपची धडक

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 11:39PMसांगली : प्रतिनिधी

सांगली-कोल्हापूर रस्त्यावर उदगाव (ता. शिरोळ) येथे असणार्‍या रेल्वे हेडब्रीजला कंटेनरने धडक दिल्याची घटना ताजी असतानाच सांगलीतील आयर्विन पुलाजवळील टिळक चौकात असणार्‍या ओव्हरहेड ब्रीजला (सीमा चिन्ह खांब) पिकअप जीपने धडक दिली. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सात हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जीपचालकावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मारूती तुकाराम लाड (वय 27, रा. येळापूर, ता. शिराळा) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. महाड येथील सावित्री पूल पुरात वाहून गेल्यानंतर सांगलीतील आयर्विन पुलाबाबतही चर्चा सुरू झाली. त्यानंतर या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली. अवजड वाहने जाऊ नयेत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर ओव्हरहेड ब्रीज (सीमा चिन्हाचे खांब) बांधण्यात आले. त्यामुळे ठराविक उंचीपेक्षा अधिक उंची असलेली वाहने या पुलावरून जाऊ शकत नाहीत. त्यानंतर बायपास रस्त्याने अवजड वाहतूक वळविण्यात आली. 

शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पिकअप जीपचा (एमएच 10 सीआर 0740) चालक मारूती लाड याने नशेत गाडी चालवून या सीमा चिन्हाच्या खांबाला धडक दिली. यामुळे खांबाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उदगाव येथील घटनेनंतर सांगलीतही ही घटना घडल्याने रविवारी दिवसभर शहरात याची चर्चा सुरू होती.