Tue, Nov 13, 2018 04:37



होमपेज › Sangli › रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळला

रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळला

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 11:39PM



सांगली : प्रतिनिधी

शहरातून कुपवाड-संजयनगरच्या दिशेने जाणार्‍या शिंदे मळ्यातील रेल्वे पुलाच्या स्लॅबचा एक मोठा तुकडा पुलाखालून जाणार्‍या टेम्पोवर कोसळला. या घटनेमध्ये मालवाहू टेम्पोच्या समारेच्या बाजूची काच फुटली आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली, या घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, मात्र रेल्वे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही.

टिंबर एरिया, बालाजी मिल, मार्केट यार्ड या मार्गावरून शिंदे मळा, अहिल्यानगर चौक संजयनगरकडे जाणारा हा रेल्वे पूल आहे. या मार्गावर नेहमी येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. रविवारी सकाळी कुपवाड वरून मालवाहू टेम्पो मार्केट यार्डकडे निघाला होता. त्यावेळी रेल्वे पुलाच्या स्लॅबचा एक मोठा तुकडा अचानक खाली कोसळला. तो तेथून जाणार्‍या टेम्पो वर कोसळला. 
स्लॅबचा मोठा तुकडा टेम्पोच्या समोरच्या बाजूच्या काचेवर पडल्याने काच फुटली. अनपेक्षित घडलेल्या या प्रकारामुळे चालकाला काही समजले नाही. त्याने तातडीने गाडी रस्त्याकडेला घेतली. त्यानंतर रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना पुढे आली. मात्र, रेल्वे प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेटही दिली नाही.