Tue, Dec 10, 2019 12:39होमपेज › Sangli › जिल्ह्यात ७६ गुन्हेगारांच्या घरावर छापे

जिल्ह्यात ७६ गुन्हेगारांच्या घरावर छापे

Published On: Jun 26 2019 1:40AM | Last Updated: Jun 26 2019 1:40AM
सांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात सोमवारी रात्री नाकाबंदी करून गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. रेकॉर्डवरील 76 गुन्हेगारांच्या घरावर छापे टाकून तपासणी करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 518 बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख 43 हजारांचा दंड वसूल केला आहे.पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी नाकाबंदीची मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील महत्त्वाचे चौक, कॉर्नर, जंक्शन, बायपास रस्ते व पूल अशा 29 ‘पॉईंट’वर नाकाबंदी लावण्यात आली होती. यामध्ये 61 पोलिस अधिकारी व 420 कर्मचारी सहभागी झाले होते.

न्यायालयाने ‘पकड वारंट’ बजावूनही पोलिसांना गुंगारा देत फरारी असलेला एक संशयित सापडला. बेकायदा दारूचा साठा करून त्याची विक्री करणार्‍या आठजणांना अटक केली. जुगाराच्या आठ केसेस केल्या.  खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 76 गुन्हेगारांच्या घरावर छापे टाकले. त्यांची घरझडती घेतली. सध्या हे गुन्हेगार काय करतात? त्यांच्या उत्पन्‍नाचे साधन काय? याबद्दल चौकशी करण्यात आली.  जामीन व अजामीनपात्र वॉरंटमधील 11 जणांना ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

गेल्या अनेक वर्षांपासून फरारी असलेल्या 38 गुन्हेगारांच्या घरावर छापे टाकले. पण एकही सापडला नाही. दारूच्या नशेत वाहन चालविणार्‍या 21 तळीरामांना अटक करण्यात  आली. त्यांची 
वाहने जप्त केली आहेत. त्याच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात खटले दाखल केले आहेत. तडीपार आदेशाचा भंग करुन शहरात आश्रयाला आलेल्या एका गुंडाला अटक केली. त्याच्याविरुद्ध नव्याने स्वतंत्रपणे गुन्हा दाखल केला आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 518 बेशिस्त वाहन चालकांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख 43 हजाराचा दंड वसूल केला आहे.

मोहिम आणखी तीव करणार : शर्मा

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, जिल्ह्यात यापूर्वी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ व नाकाबंदीची मोहिम सातत्याने राबविली जाईल. सर्वसमान्यांना सुरक्षेची भावना वाटावा, गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी कारवाईत सातत्य ठेवले जाईल.