Sat, Apr 20, 2019 08:29होमपेज › Sangli › वारणाटापूत रस्ते बनले ‘रेसकोर्स रोड’

वारणाटापूत रस्ते बनले ‘रेसकोर्स रोड’

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 8:57PMबागणी  : प्रतिनिधी

वारणा टापूतील बहुतेक सर्वच मार्गावर काही हौशी तरुण आपल्या घोड्यांना शर्यतीचा सराव करीत आहेत. भागातील बहुतेक सर्वच मार्गांना ‘रेसकोर्स रोड’चे स्वरुप आले आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यावरच प्रशासन आणि पोलिस विभाग याची दखल घेणार का, असा सवाल या भागातून केला जातो आहे.या भागात अनेक गावांमध्ये अनेक तरुणांनी हौसेसाठी घोड्यांचे संगोपन केले आहे. यातील बहुसंख्य घोडे पळविण्यासाठी, पळण्याचा सराव करण्यासाठी बागणी - शिगाव, बागणी-ढवळी, बागणी-नागाव, बावची मार्ग आदी रस्त्यांवर हे घोडे पळविले जातात. दुचाकी चालविणार्‍या तरुणाच्या मागे हातात घोड्याची दोरी घेऊन बसलेला तरुण आणि त्यासोबत पळणारे घोडे हे चित्र या भागासाठी प्रातिनिधीक झाले आहे. 

या भागातील बहुतेक सर्वच रस्ते आधीच अरुंद आहेत. समोरुन भरधाव येणारी दुचाकी आणि त्यासोबत भरधाव पळत येणारे घोडे पाहून समोरुन येणारा दुचाकीस्वार हमखास दचकतो. यातूनच मग अनेक लहान लहान अपघात घडत आहेत. विशेषत: याचा फटका काहीही संबंध नसताना वृद्धांना बसू लागला आहे. अशा काही घटना भागात घडल्या आहेत. मात्र, या तरुणांवर प्रशासन अथवा पोलिस विभाग काहीच कारवाई करीत नाही. त्यामुळे बेलगाम झालेले यातील अनेक  हौशी अश्‍वमालक आता रस्ता आपल्यासाठीच फक्‍त, बाकीच्यांनी बाजूने जायचे या अविर्भात आपल्या घोड्यांना पळवित आहेत.

विशेषत: दुधगाव रस्ता, खोची रोड, ढवळी रोड या मार्गावर अशा घोडेस्वारांनी चांगलाच धुमाकूळ घातला असल्याचे भागातील चित्र आहे.यातून अनेक लहान-मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळू लागले आहे. या तरुणांची कायद्याला आव्हान देत सुरू असलेली अरेरावी संतापजनक ठरू लागली आहे. यातूनच कदाचित या भागात वाद-विवादांना आमंत्रण मिळू शकते, अशी प्रतिक्रिया आहे. या सार्‍याच गर्दीच्या आणि वाहनांची नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवर सुरू असलेल्या या घोड्यांच्या शर्यंतीचा सराव प्रशासन कधी बंद करणार, असा सवाल या निमित्ताने भागातून उपस्थित केला जातो आहे.