Tue, Jul 23, 2019 04:16होमपेज › Sangli › ताळेबंदात ‘ते’ 112 कोटी ‘कॅश इन हॅण्ड’!

ताळेबंदात ‘ते’ 112 कोटी ‘कॅश इन हॅण्ड’!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

रद्द पाचशे, हजार रुपयांच्या शिल्लक नोटा ताळेबंदात ‘लॉस असेट’ (बुडीत) म्हणून दाखविण्याची व त्यापोटी तरतूद करण्याची गरज नाही. ही रक्कम ताळेबंदात ‘कॅश इन हॅण्ड’ दाखवावी, असे स्पष्टीकरण पुणे जिल्हा बँकेचे सर्वोेच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. रविंद्र अडसुरे यांनी पुणे जिल्हा बँकेला दिले आहे. त्यामुळे पुणे, सांगली, कोल्हापूरसह 8 बँकांकडील 112 कोटी रुपये ताळेबंदात बुडित न दाखविता ‘कॅश इन हॅण्ड’ दाखविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा बँकेतून देण्यात आली. 

केंद्र शासनाने दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. दरम्यान दि. 8 नोव्हेंबर 2016 अखेर जिल्हा बँकांकडील पाचशे, हजार रुपयांच्या नोटा ‘आरबीआय’ने स्विकारल्या नाहीत. सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, वर्धा, नागपूर, अमरावती, नाशिक या आठ जिल्हा बँकांकडील 112 कोटी रुपयांचा प्रश्‍न निर्माण झाला. ही रक्कम ‘आरबीआय’ने स्विकारावी यासाठी जिल्हा बँकांचे प्रयत्न सुरू होते. तोपर्यंत नाबार्डने परिपत्रक काढून दि. 8 नोव्हेंबर 2016 अखेर जिल्हा बँकांकडील पाचशे, हजार रुपयांच्या नोटांची रक्कम ‘लॉस असेट’ ठरविली. या रकमेची तरतूद ताळेबंदात करावी, असे  निर्देशही दिले. 

दरम्यान नाबार्डच्या या परिपत्रकाविरोधात पुणे, सांगलीसह आठ जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पुणे जिल्हा बँकेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात दि. 23 मार्च, 26 मार्च व दि. 28 मार्चला सुनावणी झाली.  पुणे जिल्हा बँकेतर्फे अ‍ॅड. रविंद्र अडसुरे हे वकील होते. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने अ‍ॅड. अडसुरे यांनी पुणे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी माहिती कळविली आहे. पुणे जिल्हा बँकेने रद्द पाचशे, हजार रुपयांच्या नोटांचे 22 कोटी 25 लाख 10 हजार 500 रुपये बँकेच्या 31 मार्च 2018 च्या ताळेबंदात ‘कॅश इन हॅण्ड’ दाखवावी. ताळेबंदात ‘लॉस असेट’ म्हणून दाखवण्याची गरज नाही, असे  अ‍ॅड. अडसुरे यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान अ‍ॅड. अडसुरे यांनी पुणे जिल्हा बँकेला पाठविलेल्या पत्राची प्रत सांगली जिल्हा बँकेकडेही उपलब्ध झाली आहे. पुणे व सांगलीसह अन्य सात बँकांकडील रद्द शिल्लक पाचशे, हजार नोटांचा विषय सारखाच आहे. त्यामुळे नाबार्डने यापूर्वी परिपत्रकात नमूद केल्यानुसार पाचशे, हजार रुपयांच्या रद्द नोटांची आरबीआयने न स्विकारलेली रक्कम ताळेबंदात ‘लॉस असेट’ला दाखविण्याची गरज नाही. त्यामुळे सांगली जिल्हा बँकेकडील 14.72 कोटी रुपयेही ताळेबंदात कॅश इन हॅण्ड दाखवले जातील, असे सांगली जिल्हा बँकेतून सांगण्यात आले. दरम्यान जिल्हा बँकांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी व अंतिम निर्णयाकडे लागले आहे. 

Tags : Sangli, Sangli News, RBI, accepted, Note, 500 rupees, 1000 rupees,  district banks


  •