Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Sangli › ‘आरटीओ’च्या जागेचा प्रश्‍न लोंबकळतच

‘आरटीओ’च्या जागेचा प्रश्‍न लोंबकळतच

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:50PMसांगली : गणेश कांबळे 

दरवर्षी तब्बल 100 कोटीपेक्षा जास्त महसूल देणार्‍या सांगलीच्या आर.टी.ओ. कार्यालयाला अजूनही हक्काची जागा मिळालेली नाही. सावळीची जागा न्यायप्रविष्ट असल्याने त्या ठिकाणी कारभार चालवता येत नाही, तर कवलापूर येथील 30 एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला होता. परंतु अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. माधवनगर रस्त्यावरील एस. टी. महामंडळाची जागा पडून आहे. त्याठिकाणी सर्वसोयींनीयुक्‍त सुसज्ज आरटीओ कार्यालय होऊ शकते. 

सांगली जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथील वसंतदादा औद्योगिक वसाहतीच्या खासगी जागेत आहे. परंतु दैनंदिन कामकाज, वाहनांची संख्या कार्यालयाचा व्याप पाहता कार्यालयासाठी सुसज्ज अशा जागेची गरज भासू लागली. सुमारे 20 वर्षांपूर्वी मिरज तालुक्यातील सावळी येथील जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी आरटीओचे कामकाज सुरू करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यातील लोकांसाठी सावळीला जाणे हे गैरसोयीचे होऊ लागले. 

एका शेतकर्‍याने जागेबाबत न्यायालयात दावा दाखल केला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ही जागा न्यायप्रविष्ट बनली आहे. त्यामुळे या ठिकाणी कामकाज चालवणे अवघड बनले. त्यानंतर सोनी रस्त्यावरील पाटगाव येथे काही जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ब्रेक टेस्ट ट्रॅक बनविला आहे. परंतु वाहतूकदारांना ते गैरसोयीचे बनत आहे.  

तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाघुले यांनी आरटीओच्या जागेचा प्रश्‍न सुटावा यासाठी कवलापूर विमानतळाजवळील जागेची पाहणी केली. त्या ठिकाणची जागा आरटीओ कार्यालयाला मिळावी, असा प्रकारचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला. आता या घटनेलाही सुमारे तीन वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु आरटीओ कार्यालयाच्या जागेचाही काही प्रश्‍न सुटला नाही. 

माधवनगर रस्त्यावरील एस. टी. महामंडळाची जागाही सोयीची

आरटीओ कार्यालयासाठी माधवनगर रस्त्यावरील एस. टी. महामंडळाची जागा आहे. या जागेवर एस. टी. महामंडळाच्यावतीने बस पोर्टल व सुसज्ज आगार उभे करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून हा प्रस्तावही पडून आहे. त्यामुळे या ठिकाणची काही जागा आरटीओ कार्यालयासाठी वर्ग केल्यास सांगलीमध्ये आटीओ कार्यालयाचा प्रश्‍न मिटणार आहे. सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे संचालक महेश पाटील म्हणाले, आरटीओ कार्यालयासाठी सुसज्ज प्रशासकीय इमारत, नागरिकांसाठी प्रतीक्षा सभागृह, वाहन चालकांसाठी प्रशिक्षण सेंटर, अत्याधुनिक वाहन परवाना परीक्षा सेंटर, ब्रेक टेस्ट ट्रॅक, मेकॅनिकल फिटनेस सेंटर, अधिकार्‍यांसाठी विश्रांतीगृह, कारवाई केलेली वाहने ठेवण्याची जागेची गरज आहे. सावळीची जागा न्यायप्रविष्ट आहे, कवलापूरच्या जागेबाबत शासनाचा नकार दिसतो. त्यामुळे माधवनगर रस्त्यावरील एस. टी. महामंडळाची काही जागा मिळाली तर सुसज्ज असे कार्यालय होऊ शकते.

तसेच असोसिएशनच्यावतीने आम्ही पटेल चौकातील ट्रक पार्किंगची जागाही सुचविलेली होती. ही जागा विकसीत करून या ठिकाणी ट्रक पार्किंग व आरटीओ कार्यालय होऊ शकते. त्यासाठी शासन व असोशिएशच्यावतीने निधी उभारून ही जागा विकसित करता येते. माजी मंत्री जयंत पाटील अर्थमंत्री असताना त्यांनी आरटीओच्या इमारतीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु जागाच उपलब्ध नसल्याने तो निधी परत गेला. त्यामुळे मंत्री, आमदार, खासदार व  जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून हा प्रश्‍न सोडविला पाहिजे. एस. टी. महामंडळाच्या जागेसाठी आम्ही सध्या परिवहन खात्याकडे पाठपुरावा करून मागणी करू, असे ते म्हणाले. 

आघाडीची 15 वर्षे, अन् भाजपची 4 वर्षे तरीही प्रश्‍न अपूर्णच

सांगलीच्या आरटीओ कार्यालयाच्या जागेचा प्रश्‍न 20 वर्षापासून प्रलंबित आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारची 15 वर्षे व सध्या भाजप सरकारची 4 वर्षे पूर्ण झालेली आहेत. सध्या जिल्ह्यात खासदार, आमदार आहेत. तरीही जागेचा प्रश्‍न सुटलेला नाही. सांगलीच्या आरटीओ कार्यालयाकडून दरवर्षी 100 कोटीच्यावर महसूल जमा होतो. राज्यात महसूल जमा करणारे दुसर्‍या क्रमांकाचे कार्यालय आहे. असे असतानाही या कार्यालयाला स्वत:च्या जागेत जाता येत नाही, ही वाईट अवस्था आहे. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांनी गेल्या वर्षी लवकरच सांगलीचे आरटीओ कार्यालय स्वत:च्या जागेत स्थलांतरीत होईल, असे सांगितले होते. परंतु अजूनही जुन्या कार्यालयातच दिवस काढावे लागत आहे.