Thu, Apr 25, 2019 16:14होमपेज › Sangli › आबांच्या पश्चात निर्माण झालेली पोकळी भरून काढेन; रोहितचे आश्वासन 

आबांच्या पश्चात निर्माण झालेली पोकळी भरून काढेन; रोहितचे आश्वासन 

Published On: May 28 2018 3:09PM | Last Updated: May 28 2018 3:12PMसांगली : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित हे ही राजकारणात सक्रीय होऊ पाहत आहेत. रोहित यांनी नुकताच तासगावमधील कवठेमहाकाळचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जनतेची भेट घेतली. त्यावेळी लोकांनी दिलेली वागणूक आणि आलेला अनुभव यासंदर्भातील एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. 

मित्रांनो आज जिथे जाईल तिथे मला आबांच्या आठवणी, प्रसंग, घटना लोक सांगत आहेत. तळागाळातील जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार हीच आबासाहेबांची खरी दौलत होती. स्व. आबा तासगाव ही आई तर कवठेमहांकाळ ही मावशी समजत होते, असे रोहित यांनी म्हटले आहे. तर खरं तर मी सध्या विद्यार्थीदशेत आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याइतपत मी निश्चित मोठा नाही. पण आबांच्या पश्चात विकासकामांची निर्माण झालेली पोकळी कुठे तरी भरून काढण्यासाठी काय करता येईल, यासाठी हा खूप छोटा प्रयत्न करतोय, असेही ते म्हणाले. 

आई आणि आमदार सुमन पाटील यांच्यासोबत प्रत्येक प्रसंगामंध्ये रोहित त्यांच्यासोबत असतो. सुमन पाटील यांनी नुकतेच पाण्यासाठी कृष्णानदीत आंदोलन केले होते. त्यातही रोहीत यांचा सहभाग होता.

रोहीत पाटील यांची फेसबुक पोस्ट ....

सर्वांना नमस्कार

गेले दोन-तीन दिवस मी कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यात फिरत आहे. आबांचा सुपुत्र म्हणून मला जनतेच्या दारापर्यंत जाण्याची संधी मिळत आहे. आबांच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबासह आपणा सर्वांवर फार मोठा आघात झाला. त्यातून आता कुठे थोडेसे सावरतोय. नियती कोणासाठी कधी थांबत नाही. डोंगराएवढे दुःख पचवून त्यातून सावरण्याची शक्तीही तुमच्यामुळे मिळत आहे. 

मित्रांनो आज जिथे जाईल तिथे मला आबांच्या आठवणी, प्रसंग, घटना लोक सांगत आहेत. तळागाळातील जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार हीच आबासाहेबांची खरी दौलत होती. आज तेच लोक प्रामुखयाने माझ्या जवळ येऊन ख्यालीखुशाली विचारत आहेत. सर्व सामान्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी या आपल्या मानून काम करणारे आबा आज पुन्हा त्यांना हवे आहेत. 

स्व. आबा तासगाव ही आई तर कवठेमहांकाळ ही मावशी समजत. तासगाव तालुक्यात अनेकवेळा फिरतोय. मात्र कवठेमहांकाळ तालुक्यात तसे पहिल्यांदाच येणे होतेय. जनतेच्या मनात काय आहे, आशा, आकांक्षा, अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्याची संधी त्यानिमिताने मिळत आहे. खरं तर मी सध्या विद्यार्थीदशेत आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याइतपत मी निश्चित मोठा नाही. पण आबांच्या पश्चात विकासकामांची निर्माण झालेली पोकळी कुठे तरी भरून काढण्यासाठी काय करता येईल, यासाठी हा खूप छोटा प्रयत्न करतोय. 

जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने जशी आबासाहेबांची कारकिर्द उजळून निघाली, तसा वरदहस्त मलाही हवाय. तालुक्यात आज अनेक प्रश्न आहेत. किंबहुना लोकच मला आपलेपणाने सांगतात. उच्च शिक्षित तरूण आज हाताला काम नसल्याने बेकार आहेत. म्हैसाळ योजना काही भागात पोचली नसल्याने शेतकरी बांधव पाण्यापासून वंचित आहेत. कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला दर नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. त्यातून काही मार्ग निघेल का, यावर चर्चा होत असते. 

काही गावांमध्ये निवडणूकांची धामधूम सुरू आहे. त्या गावातील लोकांना भेटण्याची, त्याच्यांशी बोलण्याची, त्यांची सुख दुःखे जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. पहिल्याच भेटीत अनेक गोष्टी साध्य होत आहेत. आबांचा वारसदार म्हणून मी आहेच. पण त्यांच्या विचारांचाही वारसा तेवढयाच ताकदीने जपला पाहिजे, याची जाणीव यानिमित्ताने होतेय....!
तुमचाच...

रोहित आर आर पाटील