सांगली : पुढारी ऑनलाईन
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांची कन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा स्मिता पाटील यांचा विवाह उद्योजक आनंद थोरात यांच्यासोबत ठरला आहे. हा विवाहसोहळा १ मे रोजी सायंकाळी पुण्यात संपन्न होणार आहे. नुकतेच स्मिता पाटील यांचा मेहंदी समारंभ पार पडला. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात यांच्याशी नोव्हेंबर २०१७ मध्ये निश्चित झाला होता. आनंद थोरात यांनी ऑस्ट्रेलियात बिझनेस मॅनेजमेंट मधून शिक्षण पूर्ण केले असून सद्या ते पुण्यामध्ये व्यवसाय संभाळत आहेत. या दोघांचा साखरपूडा १० डिसेंबर २०१७ रोजी अंजनी येथे आबांच्या गावी पार पडला होता.
स्मिता यांच्या विवाहासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. हा विवाह शरद पवार यांच्या देखरेखीखाली होणार आहे. या लग्नाची सर्व जबाबदारी पवारांनी थोरात यांच्याकडे सोपविली आहे. आबांना दोन मुली व मुलगा रोहित आहे. मात्र, हे सर्व जण अद्याप महाविद्यालयीन व शालेय शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आबांच्या माघारी शरद पवारांनी स्मिताच्या लग्नात लक्ष घातले आहे.