Wed, Jul 24, 2019 12:29होमपेज › Sangli › गुन्हेगारांना खड्यासारखे बाजूला काढा!

गुन्हेगारांना खड्यासारखे बाजूला काढा!

Published On: May 26 2018 12:51AM | Last Updated: May 25 2018 8:16PMसांगली : अभिजित बसुगडे

महापालिका निवडणुकीसाठी हौसे, गवसे आणि नवसे तयारीला लागले आहेत. यामध्ये तीनही शहरातील गुन्हेगारही आघाडीवर असल्याचे दिसत आहे. महापालिकेचा कारभार पारदर्शी करून भ्रष्टाचारमुक्तीसाठी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍यांसह गुन्हेगारांना सर्वच राजकीय पक्षांनी खड्यासारखे बाजूला काढावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. गुन्हेगारीची अडचण लक्षात घेऊन संबंधितांनी आपली पत्नी, मुलांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. 

शेरीनाला, घनकचरा प्रकल्प, जपानी बँकेचे कर्ज अशा प्रकारांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे नाव संपूर्ण राज्यात झाले आहे. वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश करण्यासाठी आता गुन्हेगारांनी तयारी सुरू केली आहे. महापालिकेची निवडणूक जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. तरीही जानेवारीपासूनच इच्छुक गुन्हेगारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांच्याकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे दिसत आहे. इच्छुकांच्या येण्या-जाण्याने राजकीय पक्षांच्या कार्यालयातही चांगलीच वर्दळ वाढली आहे. गतवर्षी शहरातील मटका बुकींच्या टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यातील बहुतांशी बुकींनी हद्दपारीला स्थगिती मिळवली आहे. ती केवळ महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच. शहरातील बहुसंख्य मटका बुकी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आपल्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीमुळे पक्षाची उमेदवारी रद्द होऊ नये यासाठी त्यांनी पत्नी, मुलांची नावे पुढे करून प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. 

मटका बुकींसह बेकायदा सावकारी करणारे फाळकूटदादा, दारूचे गुत्ते, दुकाने चालविणारे मद्यसम्राट, वाळूची तस्करी करणारे माफीया आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य ठेवीदारांच्या आयुष्याची कमाई बुडविणारे पतसंस्था चालक यांचा समावेश आहे. बहुतांशी राजकीय पक्षांकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे असे गुन्हेगार उमेदवारी मागत आहेत. यातील अनेकांनी उमेदवारी दिल्यास प्रभागातील सर्व खर्च करण्याची तयारीही नेत्यांकडे दर्शवली आहे. 

राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अलिकडेच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍यांना उमेदवारी देणार नसल्याची घोषणा जाहीर सभांमध्ये केली आहे. गेल्या निवडणुकीत गुन्हेगारांच्याच उमेदवारीसह पाठबळावर नगरसेवक निवडून आणणारे नेतेच आता अशी भाषा करू लागले आहेत. मात्र राजकीय नेत्यांची ही विधाने सत्यात उतरणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे. अवैध व्यवसायातून मिळविलेली कोट्यवधीची संपत्ती असल्याने अशा गुन्हेगारांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. अवैध व्यावसायिकांसोबतच ग्रुपच्या नावावर फाळकूटदादा म्हणून शहरांत दहशत माजविणारेही आता सक्रिय झाले आहेत. आपल्या साथीदारांच्या जीवावर त्यांनी निवडणुकीचे शिवधनुष्य पेलण्याचा विडा उचलला आहे. कुळ काढणे, सावकारी करणे, दहशत निर्माण करणे, लोकांचे वाद मध्यस्थीने मिटवणे अशा समाजकार्यात पुढे असणारेही आता पक्षांच्या कार्यालयांचे उंबरे झिजवू लागले आहेत. 

अवैध व्यवसाय आणि दहशतीच्या जीवावर यांना नगरसेवक होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र सध्याची प्रभाग रचना पाहता राजकीय पक्षाच्या उमेदवारीखेरीज यांचे काहीच चालणार नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच हे गुन्हेगार कुटुंबातील व्यक्तीला पुढे करून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मटका, सावकारी, तस्करी, बुडवेगिरी, दहशतीने लुटणार्‍यांनी त्यांची सेवा करण्याची संधी मागणेच हास्यास्पद आहे. काहीही करून महापालिकेची सत्ता हस्तगत करायचीच, असा चंग बांधलेले राजकीय पक्ष साम, दाम, दंड, भेद वापरणार्‍या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या लोकांनाच उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. त्याचेच पडसाद सध्या नागरिकांतून उमटू लागले आहेत. त्यामुळेच अशांना खड्यासारखे बाजूला करण्याची मागणी होत आहे. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अनेक मटका बुकी, रेकॉर्डवरील गुंड, वाळू तस्कर, दहशत माजवणार्‍या टोळ्या हद्दपार, स्थानबद्ध केल्या आहेत. ही निवडणूक निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी केली आहे. राजकीय पक्षांनी जर गुन्हेगारांना उमेदवारी दिली नाही तर पोलिसांवरील ताणही हलका होणार आहे. शिवाय त्यांना कारवाई करणेही सहजशक्य होणार आहे. 

तीनही शहराचा विकास करायचा असेल तर खाबुगिरीसह अवैध मार्गाने पैसे कमावणार्‍यांना वेळीच रोखण्याची गरज आहे. त्यासाठीच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍यांसह गुन्हेगारांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना खड्यासारखे बाजूला ठेवणेच नागरिकांच्या हिताचे आहे. म्हणूनच राजकीय पक्षांनी नागरिकांच्या भावनांची दखल घेत स्वच्छ प्रतिमा, चारित्र्य आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असलेल्यांनाच उमेदवारी देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा नागरिक अशा पक्षांना सत्तेपासून दूर ठेवतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

ठेवी, पतसंस्था बुडव्यांची जोरदार चलती...

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील अनेक पतसंस्था चालकांनी ठेवीदारांच्या ठेवी बुडवल्या आहेत. शिवाय काहींच्या भ्रष्टाचारामुळे संस्थाच बुडाल्या, बंद पडल्या आहेत. यातून कोट्यवधींची माया मिळवणारे बुडवे महापालिकेत नगरसेवक म्हणून जाण्याच्या तयारीत आहेत. सर्वसामान्यांच्या आयुष्याची पूंजीच घशात घालणार्‍या अशा बुडव्यांनाही राजकीय पक्षांनी चार हात दूर ठेवण्याची गरज आहे. ठेवी, पतसंस्था बुडव्यांना मानाचे स्थान मिळूच नये, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे. म्हणूनच अशा बुडव्यांना उमेदवारी न दिल्यास राजकीय पक्षांना फायदा होऊ शकतो.