Fri, Jul 19, 2019 01:30होमपेज › Sangli › बुथ कमिटींपासून ‘शंकास्पदां’ना ठेवले दूर

बुथ कमिटींपासून ‘शंकास्पदां’ना ठेवले दूर

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:04AMसांगली : प्रतिनिधी

महानगरपालिका क्षेत्रातील काही आजी-माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. काहींचे प्रवेशही झाले आहेत. अशाप्रकारच्या आऊटगोईंगमुळे पक्ष संघटनेला धक्का बसू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुथ कमिटीमध्ये अध्यक्ष व सदस्य निवड करताना दक्षता घेतली जात आहे. ‘शंकास्पदां’ना बुथ कमिटीपासून दूर ठेवण्याचा सावध पवित्रा राष्ट्रवादीने अवलंबला असल्याचे सुत्रांनी सांगितले. सांगली महापालिका निवडणूक व बुथ कमिटी स्थापन करण्याच्या अनुषंगाने बुधवारी सांगलीत पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक झाली.जिल्हाध्यक्ष (शहर) संजय बजाज, कमलाकर पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (शहर) राहुल पवार, सागर घोडके, प्रा. पद्माकर जगदाळे, श्रीनिवास पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुथ कमिटीच्या बळकटीद्वारे पक्ष संघटना बळकटीचा मंत्र पक्षाला दिला आहे. त्यानुसार बुथ कमिट्या स्थापन करण्याच्या हालचालींना गती आली आहे. कमिट्या प्रभावीपणे स्थापन व्हाव्यात. बुथ कमिटीचे अध्यक्ष, सदस्य निवडताना क्रियाशील व निष्ठावंतांना संधी द्यावी, अशा सुचना आहेत. सांगली महापालिका क्षेत्रातील बुथ कमिट्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. महापालिका क्षेत्रात 40 टक्के बुथ कमिट्यांवरील निवडी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत काम 60 बुथ कमिट्यांवरील निवडी पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होणार आहेत.  

महापालिका निवडणुकीत ‘आऊटगोईंग’ची चर्चा जोरात आहे. अन्य पक्षांमधील काही नगरसेवक, कार्यकर्त्यांभोवती भाजपने गळ टाकलेले आहेत.  त्यामुळे राष्ट्रवादीने बुथ कमिट्या स्थापन करताना सावधगिरी बाळगली आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होऊन पक्ष सोडून काहीजण गेले तर त्यांच्या प्रभागातील बुथ कमिटीही विसर्जित करावी लागू नये अशी दक्षता घेत बुथ कमिटींचे अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यावर राष्ट्रवादीने भर दिल्याचे सुत्रांनी सांगितले.