होमपेज › Sangli › मुलीला विहिरीत ढकलून मारले

मुलीला विहिरीत ढकलून मारले

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 30 2018 12:09AMआष्टा : प्रतिनिधी

पडवळवाडी (ता. वाळवा) येथे  एका मनोरुग्ण महिलेने आपल्या 7 वर्षांच्या मुलीला विहिरीत ढकलून मारले; स्वत:ही विहिरीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. सौ. अबोली अंकुश शिंदे (वय 33, रा.पडवळवाडी ता. वाळवा, मूळ गाव कोकळे ता. कवठेमहांकाळ) असे महिलेचे नाव आहे, तर कु. अरुंधती (वय 7) असे तिच्या मुलीचे नाव आहे.
आाष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिसांनी या  महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 सौ. अबोली हिचे माहेर पडवळवाडी तर सासर कोकळे आहे.अबोली शिंदे हिच्यावर 2010 पासून उपचार सुरू आहेत. ती मनोरुग्ण असल्यामुळे ती माहेरी पडवळवाडी येथेच रहात होती. तिचा नवरा कामानिमित्त पुणे येथे असतो. अधूनमधून तो पडवळवाडीस येत असतो. अबोलीने आजारास कंटाळून यापूर्वी गळफास लावून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मुलगी अरुंधतीचे कसे होईल याविषयी तिला सतत काळजी वाटत होती. तसे ती बोलूनही दाखवत होती.

शनिवारी (दि.27) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अबोलीचे आई-वडील नात अरुंधतीला घेऊन देवळात हरिपाठ ऐकण्यासाठी गेले होते. 7.30 वाजण्याच्या सुमारास अबोलीने मुलगीला वरात दाखवायला घेऊन जातो असे सांगून नेले. रात्री 8 वाजता आई-वडील घरी आले असता घराला कुलूप असल्याचे दिसले. शोधाशोध केली असता ती शरद ज्ञानदेव खोत यांच्या शेतातील विहिरीतील अबोली पाण्यात  गंटागळ्या खात असताना दिसली. जमलेल्या लोकांनी तिला बाहेर काढले. मुलगी अरुंधती हिची चौकशी केली असता तिने ती विहिरीतच असल्याचे सांगितले. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर  रविवारी (दि.29)  तिचा मृतदेह  मिळून आला.

आष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत अबोलीचे वडील बाळासाो रामचंद्र अनुसे यांनी मुलगी अबोलीविरुद्ध नातीला विहिरीत ढकलून मारल्याबाबत व स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सौ. तेजश्री पवार या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.