Thu, Apr 25, 2019 21:29होमपेज › Sangli › शुध्द पाण्याचे सांगलीचे स्वप्न साकार

शुध्द पाण्याचे सांगलीचे स्वप्न साकार

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 9:02PMसांगली : अमृत चौगुले

सांगली, कुपवाडच्या पाण्याचा प्रश्‍न आता निकाली निघणार आहे. महापालिकेने यासाठी सुजल निर्मल योजनेतून 37.85 कोटी आणि वारणा उद्भव पाणी (युआयडीएसएसएमटी) योजनेतून 128 कोटी रुपये खर्च केले आहेत. माळबंगला येथे 56 व 70 एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राची उभारणी पूर्ण झाली असून, आता शहराला शुध्द व मुबलक पाणी मिळणार आहे. भविष्यातील 2043 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन 126 एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल.

तत्कालीन नगरपालिका काळात हिराबाग वॉटर वर्क्स येथे 28 एमएलडी आणि माळबंगला येथे 36 एमएलडी असे दोन जलशुध्दीकरण केंद्रे होती. ती सुमारे 50 वर्षांपूर्वीची होती. परंतु कृष्णा नदीत मिसळणारा शेरीनाला आणि कालबाह्य झालेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पामुळे सांगलीचा दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता. शिवाय महापालिका क्षेत्रात असूनही कुपवाडला एमआयडीसीकडून पाणी विकत घ्यावे लागत होते.

दरम्यान, गेल्या 2006 मध्ये पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी वारणा उद्भव पाणी योजना मंजूर झाली होती. एकूण 79.02 कोटींच्या योजनेतून वारणातून पाणी माळबंगला येथे आणून शुध्दीकरण करण्याचा हेतू होता. परंतु महाआघाडीच्या काळात वारणेतून पाणी उचलण्याऐवजी शुध्दीकरण प्रकल्पाच्या बळकटीकरणासह पाणीपुरवठा सक्षमीकरणाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये माळबंगला येथे उपलब्ध 36 एमएलडी जलशुद्धिकरण केंद्राचे 56 एमएलडी नूतनीकरण आणि नव्याने 70 एमएलडी जलशुद्धिकरण केंद्र उभारणीचा निर्णय घेण्यात आला. माळबंगला येथे नव्याने जॅकवेल उभारणी तसेच शहरात पाणीपुरवठा सक्षमीकरण करण्यात आले.

अर्थात दोन वर्षांच्या या कामाला तब्बल आठ-दहा वर्षे लागली. त्यानुसार गेल्यावर्षी 56 एमएलडी अत्याधुनिक पध्दतीचा प्रकल्प कार्यान्वित झाला. आता 70 एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. सध्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी सुरू आहे. वास्तविक या दोन्ही शहरांना सध्या 65 ते 70 एमएलडी पाणी लागते. त्यासाठी या योजनेतून महापालिकेकडून 70 ते 72 एमएलडी पाणी उपसा केला जातो. आता काही वाहिन्यांच्या जोडण्यांचे किरकोळ काम राहिले होते. तेही पूर्ण झाले. त्यानुसार सांगलीतील आठ पाण्याच्या टाक्या एकाच वेळी भरल्या जात आहेत. त्यानुसार नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

भविष्यात 7 लाख लोकांची पाणीपुरवठ्याची सोय

सांगली व कुपवाडसाठी सध्या 4.15 लाख लोकसंख्येसाठी 68 एमएलडी पाणीपुरवठा मुबलक आहे. परंतु भविष्यातील वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेेता 126 एमएलडी क्षमतेची केंद्रे उभारली आहेत. सध्याच्या यंत्रणेतून केवळ दोन पंपाद्वारेच पाणीउपसा केला जात आहे. यातून क्षमता 70 एमएलडीची असली तरी सध्या 38 ते 40 एमएलडी पाणी शुद्धीकरण केले जाते. 56 एमएलडीमधून दररोज 32 एमएलडी पाणी शुद्धीकरण करून पुरवठा केला जात आहे. भविष्यात पाण्याची गरज पाहून उपसा वाढविला जाणार आहे. त्यासाठी नव्याने जॅकवेलवर 335 एचपीचे दोन पंप बसविले जाणार आहेत. यामुळे 2043 पर्यंत 7 लाख लोकसंख्येला पुरेल इतके सक्षमीकरण असेल.

अमेरिकन स्काडा तंत्रज्ञानाचा वापर

अमेरिकन स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करून 70 व 56 एमएलडी अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. यामध्ये 56 एमएलडी नूतनीकरणासाठी 2.50 कोटी रुपये तर 70 एमएलडीसाठी 31 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे संपूर्ण कंट्रोलिंग संगणकीकृत असून, शहरात होणार्‍या पाणीपुरवठ्याचे नियोजनही याच पद्धतीने होणार आहे. 

Tags : Sangli, Sangli news, Purified water, dream complete,