Mon, Jun 17, 2019 02:12



होमपेज › Sangli › पुणे-बंगळूर महामार्ग लवकरच सहापदरी

पुणे-बंगळूर महामार्ग लवकरच सहापदरी

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 12:26AM



इस्लामपूर : मारूती पाटील

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागलपर्यंतच्या सहापदरीकरण कामास लवकरच सुरुवात होणार आहे. या महामार्गावर येणार्‍या वाळवा तालुक्यातील 12 गावांतील सुमारे साडे चौदा हेक्टर जमीन यासाठी संपादित होणार आहे. 

यापूर्वी या मार्गाचे चौपदरीकरण झाले होते. त्यावेळी अनेक शेतकर्‍यांची जमीन संपादित झाली होती. राहती घरे, हॉटेल्स व इतर इमारतीही रुंदीकरणाच्यावेळी पाडण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी उड्डाणपूल झाल्यामुळे त्याचा व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. या महामार्गाचे चौपदीकरण होऊन 15 वर्षे होत आली तरीही अनेक ठिकाणच्या सेवा रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. हा मुंबई ते चेन्नई असा सुमारे 1235 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बंगळूर ही प्रमुख शहरे येतात. 

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुराकोन प्रकल्प-1 चा ‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग’ हा भारतातील पहिला प्रकल्प होता. या महामार्गाचे पुणे ते सातारापर्यंतचे सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता दिवाळीनंतर सातारा ते कागलपर्यंतच्या 133 किलोमीटरच्या सहापदरीकरण कामाचाही प्रारंभ होत आहे.

या मार्गावर वाळवा तालुक्याची 28 किलोमीटरची हद्द येते. यामध्ये कासेगावपासून ते कणेगावपर्यंत 12 गावे येतात. सहापदरीकरणासाठी साडे चौदा हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये कासेगाव  50, इटकरे  82, काळमवाडी 11, कामेरी 21, कणेगाव 29, केदारवाडी 8, नेर्ले 8, पेठ 3, तांदुळवाडी 53, वाघवाडी 15, येडेनिपाणी 7, येलूर 44 अशी  331  शेतकर्‍यांची  शेतजमीन संपादित  होणार आहे. यात सरकारी जमिनीचाही समावेश आहे. ज्या शेतकर्‍यांची जमीन संपादित होणार आहे त्यांना अपील करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.  महामार्गाच्या चौपदरीकरणा-वेळेस चौपदरीकरणासह सेवा रस्त्यासाठीही जमीन संपादित करण्यात आली होती. त्यामुळे सहापदरीकरणासाठी जास्त जमीन संपादित होणार नाही.   या सहापदरीकरणात नेर्ले, वाघवाडी, येलूर, कणेगाव आदी ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग होणार असल्याचेही समजते. पावसाळा संपताच कामाला सुरुवात होणार आहे.