Thu, Jun 20, 2019 00:32होमपेज › Sangli › विषमता पसरविण्यासाठी जातीतील एजंटाचा वापर

विषमता पसरविण्यासाठी जातीतील एजंटाचा वापर

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 26 2018 12:10AMसांगली : प्रतिनिधी

समाजात विषमता पसरविण्यासाठी प्रत्येक जातीत एजंट निर्माण झाले आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना वेळीच बाजूला सारा, असे आवाहन विविध वक्त्यांनी केले. फुले- आंबेडकर विद्वत सभेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहास, या विषयावर येथील स्टेशन चौकात जाहीर सभा झाली. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष प्रा. म. ना. कांबळे होते. सत्यशोधक शिक्षक सभेचे अध्यक्ष प्रा. शाम मुंढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्यासाठी लढा उभारला होता.

कोणत्याही धर्मासाठी त्यांचा लढा नव्हता. परंतु, सध्या काहीजण शिवाजी महाराज मुुस्लिम विरोधी होते, अशी अफवा फसरवत आहेत. आतापर्यंत प्रत्येक जाती- जातींमध्ये विष पेरण्याचे काम सुरू होते. परंतु भीमा-कोरेगाव घटनेनंतर सर्व जाती एकत्र येत आहेत. त्यामुळे हा चळवळी उभारण्याचा काळ आहे. येत्या दीड वर्षात या चळवळीने प्रयत्न केले तर सर्व व्यवस्था बदलवू शकतो.

मागासवर्गीय समाजाने शिवाजी महाराजांना, तर मराठा समाजाने बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे ते एकमेकांचे शत्रू न होता, एकत्र येतील आणि खर्‍या शत्रुला ओळखतील. दंगली घडविण्यासाठी बहुजन समाजातील अशिक्षीत मुलांचे ब्रेनवॉश करून वापर केला जातो. त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त केले जाते. अशा मुलांपर्यंत पोहचून त्यांचे प्रबोधन केले पाहिजे. सुशिक्षीत लोक कधीही दंगलीत जात नाहीत. त्यामुळे शिवाजी महाराज हे जात बघून काम देत नव्हते. तर समोरच्याची योग्यता पाहून कामाला ठेवत होते. 

समाजा समाजामध्ये जन्मापासून मरेपर्यंत मनस्मृतीने शोषणाची व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. हे शोधले पाहिजे. त्यामुळे असे लोक शिवाजी महाराज व बाबासाहेबांबद्दल जे काही सांगतात, त्यावर विश्‍वास न ठेवता स्वत: वाचले पाहिजे, असे ते म्हणाले. 

समाजिक कार्यकर्ते हमराज उईके म्हणाले, पाच हजार वर्षापूर्वीची गुलामगिरी पुन्हा सुरू करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये बहुजन समाजाची प्रगती होत आहे, हे समजल्यानंतर नोकर्‍या बंद केल्या जात आहेत. या समाजाच्या पुढच्या पिढीची शिक्षणाची दारे बंद करण्याचे षङयंत्र रचले जात आहे. जाती-जातींमध्ये भांडणे लावून त्यांना विकासापासून दूर ठेवले जात आहे, या सर्व गोष्टी समजून घेऊन बहुजनांनी एकत्र आले पाहिजे.हर्षाली पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बी. बी. घाडगे यांनी आभार मानले.