होमपेज › Sangli › विट्यात संजय राऊतांच्या विरोधात निदर्शने 

विट्यात संजय राऊतांच्या विरोधात निदर्शने 

Last Updated: Jan 17 2020 6:07PM
विटा : वार्ताहर

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागत त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर संजय राऊत यांच्या वक्तव्याचा विरोध करत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवप्रेमींनी जोरदार निदर्शने करून आपला परिसर बंद ठेवण्याची हाक दिली होती. त्यानुसार आज शिवप्रेमींनी विटा बंदची हाक दिली. यावेळी शहरातील प्रमुख मार्गांसह उपनगरातून राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध मिरवणूक काढण्यात आली. 

विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या निषेध मिरवणुकीला सुरूवात झाली. यावेळी शहर परिसरात सुरू असणाऱ्या दुकानांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा श्लोक म्हणत शिवप्रेमींनी दुकानदारांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे विनंती केली. विटा शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या या निषेध मिरवणुकीला विटेकरांनी देखील जबरदस्त प्रतिसाद दिला. तर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

वाचा : महाविकास आघाडीचे मन मोठे होते म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री : आमदार रोहित पवार

यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर खासदार संजय राऊत यांचा फोटो जाळत शिवप्रेमींनी संजय राऊत यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते, अॅड. विनोद गोसावी, महेंद्र माने, विजय नागमल, महेश बाबर, धीरज पाटील, विजय सपकाळ, शिवप्रसाद सुतार, श्रीधर जाधव, आर. टी. पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.