Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Sangli › लॉजवर वेश्या व्यवसाय : तिघांना अटक

लॉजवर वेश्या व्यवसाय : तिघांना अटक

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 18 2018 11:49PMसांगली : प्रतिनिधी

आष्टा (ता. वाळवा) येथील इस्लामपूर रस्त्यावर असणार्‍या सिद्धी लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. याप्रकरणी हॉटेल मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. 
याप्रकरणी लॉजचा मालक सचिन हरिश्‍चंद्र माने (वय 38, रा. लक्ष्मीबाई नायकवडीनगर), व्यवस्थापक तुकाराम पांडुरंग गावडे (वय 30, रा. चव्हाण कॉलनी), रूमबॉय छोटू जंबाजी पेटारे (वय 23, रा. आनंद कॉलनी, आष्टा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यावेळी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची सुटकाही करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. 

खबर्‍याकडून मिळाली माहिती

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी वेश्या व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक काम करीत होते. पोलिस निरीक्षक राजन माने यांना आष्ट्यातील सिद्धी लॉजवर अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. 

शनिवारी रात्री उशिरा पथकाने सिद्धी लॉजवर छापा टाकला. त्यावेळी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. त्यानंतर तीनही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिल्पा यमगेकर, भगवान नाडगे, विकास पाटणकर, लता गावडे, कविता पाटील, स्नेहल मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

आष्टा परिसरात खळबळ दरम्यान, आष्ट्यातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाल्याने शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील अन्य लॉजवरही अशी बेकायदा कृत्ये चालत असल्याची चर्चा  आहे.