Wed, Apr 24, 2019 16:16होमपेज › Sangli › चांदोली पर्यटन विकासाचा प्रस्ताव द्या

चांदोली पर्यटन विकासाचा प्रस्ताव द्या

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jul 01 2018 12:01AMसांगली : प्रतिनिधी

चांदोलीत पर्यटन विकास करण्यासाठी नेमकी किती जागा लागणार आहे, याचा प्रस्ताव तयार करून पंधरा दिवसात द्या, असे आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी शनिवारी संबंधीत विभागांना दिले. 

चांदोली पर्यटन विकासासंदर्भात  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यात त्यांनी हे आदेश दिले.  आमदार शिवाजीराव नाईक, तसेेच वन, बांधकाम,  पर्यटन महामंडळ, मत्स्य, पाटबंधारे या विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

चांदोली परिसराचा विकास करण्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आमदार नाईक यांचा त्यासाठी गेली अनेक वर्षे  पाठपुरावा सुरू आहे. त्यासंदर्भातच जिल्हाधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत चांदोली येथे बैठक झाली. त्यानंतर मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. मात्र अद्यापही चांदोली पर्यटन विकासाला गती आलेली नाही. 

त्या पार्श्‍वभूमीवर आज विविध विभागातील अधिकार्‍यांची पुन्हा बैठक घेण्यात आली. या ठिकाणी वनविभागाकडून उद्यान, सांस्कृतिक सभागृह, मत्स्य विभागाकडून मत्स्यालय आणि एमटीडीसीकडून निवास व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नेमकी किती जागा लागणार, याबाबत पंधरा दिवसात प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे. 
आमदार नाईक म्हणाले, सध्या पाटबंधारे विभागाची जागा आहे.  संबंधीत विभागांकडून प्रस्ताव आल्यानंतर कृष्णाखोरे महामंडळाकडे जागेची मागणी करण्यात येणार आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर हा परिसर विकसित करण्याच्या कामाला गती मिळेल.