होमपेज › Sangli › वीस टोळ्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव

वीस टोळ्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 04 2018 1:19AMसांगली : प्रतिनिधी

गणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सुमारे वीस टोळ्यांतील शंभर जणांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. उत्सवापूर्वी या प्रस्तावांना अधीक्षकांकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 

गणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर ऑगस्टअखेर जिल्ह्यातील 136 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली. गणेशोत्सवापर्यंत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अधीक्षक  शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जिल्ह्यात विभागवार बैठका घेण्यास प्रांरभ केला आहे. इस्लामपूर, तासगाव, विटा, जत आदि शहरांमध्ये यासंदर्भात बैठका घेण्यात येणार आहेत.

प्रलंबित गुन्ह्यांसह कायदा, सुव्यस्थेचा आढावा या बैठकांमध्ये घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह संशयितांवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ऑगस्ट महिना अखेरीस जिल्ह्यातील 136 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे पिंगळे यांनी सांगितले. त्याचबरोबर 50 टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार असून पोलिस अधीक्षकांकडे त्याबाबत सुनावणी सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.