Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Sangli › जुन्या नोटांबाबतची सुनावणी लांबणीवर

जुन्या नोटांबाबतची सुनावणी लांबणीवर

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 12:28AMसांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्हा बँकेकडील पाचशे, हजार रुपयांच्या 14.72 कोटी रुपयांबाबतची सुनावणी बुधवारपर्यंत (दि. 12) लांबणीवर गेली आहे. सांगलीसह आठ जिल्हा बँकांकडील 112 कोटी रुपये ‘आरबीआय’ने भरून घेतले नाहीत. ही रक्‍कम या बँकांकडे पडून आहे. ‘आरबीआय’ने ती जमा करून घ्यावी यासाठी या बँकानी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.  

केंद्र शासनाने दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी  पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार जिल्हा बँकांनी दि. 10 ते 13 नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारल्या होत्या. मात्र, जिल्हा बँकांकडील या नोटा स्विकारण्यास ‘आरबीआय’ने टाळाटाळ केली. त्याविरोधात जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘आरबीआय’ने या नोटा स्विकारण्यास सहमती दर्शवली.  मात्र, दि. 10 ते 13 नोव्हेंबर या  कालावधीत जमा झालेल्या नोटा स्वीकारल्या. दि. 8 नोव्हेंबर 2016 अखेर जिल्हा बँकात शिल्लक पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारण्यास ‘आरबीआय’ने नकार दर्शविला.

नाबार्डने तर सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, वर्धा, नागपूर, अमरावती, नाशिक या 8 जिल्हा बँकांना पत्र काढून एकूण 112 कोटी रुपये बुडीत ठरविले. याविरोधात या बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी व निकालाकडे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होती. मात्र, ‘आरबीआय’चे वकील उपस्थित नसल्याने सुनावणी झाली नाही. पुढील सुनावणी दि. 12 रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.