Thu, Apr 25, 2019 03:34होमपेज › Sangli › उत्पादक, तस्करांकडे कोटींची माया!

उत्पादक, तस्करांकडे कोटींची माया!

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 8:07PMसांगली : अभिजित बसुगडे

आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली जात असली तरी ठराविक शेतकर्‍यांचा तेच मुख्य पीक घेण्याचे उद्दिष्ट असल्याचे चित्र आहे. गॉडफादरच्या जीवावर गांजा उत्पादन करून त्याची तस्करी करणार्‍यांनी कोट्यवधींची माया जमवली आहे. या व्यवहारात गॉडफादरला घरबसल्या आयते भरघोस उत्पन्न मिळते आहे. शिवाय गुन्हेगारांनीही गांजा विक्रीचा जोडधंदा सुरू केला आहे. शेतकर्‍यांना गांजाची लागवड करण्यासाठी सक्ती करणारी गॉडफादरची एक टोळीही कार्यरत असल्याची चर्चा आहे.  

अलिकडच्या काळात गांजा उत्पादक, तस्कर आणि विक्रेत्यांवर किरकोळ स्वरूपात कारवाई झाली आहे. त्यामुळे याचे उत्पादन घेण्यात, विक्री करण्यात कोणताही धोका नसल्याचे सांगून अनेकांना गांजा उत्पादन आणि विक्रीसाठी भाग पाडणारे तस्कर चांगलेच कार्यरत आहेत. पोलिसांकडून होणार्‍या जुजबी, तात्कालिक कारवाईमुळे अनेकजण या व्यवसायात बिनदिक्कतपणे उतरत असल्याचे चित्र आहे. यातूनच गांजा उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय संपूर्ण जिल्हाभर फोफावला आहे. 

गुटखा, माव्याप्रमाणे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीस ते पंचवीस ग्रॅमच्या गांजाच्या पुड्यांची सर्रास विक्री केली जाते. नेहमीच्या ग्राहकाकडून एका पुडीसाठी पन्नास ते शंभर रुपये आकारले जातात. एखादा नवीन ग्राहक आल्यास त्याची शहानिशा करून नंतर त्यांला दोनशेहून अधिक रुपयांना एका पुडीची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी गुन्हेगारांना फुकट गांजा पुरवला जातो. गुन्हेगारांना गांजाचे उत्पादक माहीत नसले तरी तस्कर आणि विक्रेत्यांशी त्यांचे लागेबांधे आहेतच. 

या व्यवसायात अनेक व्हाईट कॉलरही असल्याची चर्चा आहे. मुळात गांजाच्या उत्पादनाला शासनाने बंदी घातली आहे. शिवाय त्याचे उत्पादन, विक्री, सेवन केल्यास कडक कारवाईची तरतूदही आहे. मात्र अशी कारवाई होताना दिसून येत नाही. सुरुवातीला गांजाचा ग्राहक कमी   होता. मात्र सध्या तरुण पिढी विशेषतः अल्पवयीन मुले या नशेच्या आहारी गेल्याने त्याचा ग्राहकवर्ग वाढला आहे.   सीमाभागात असलेल्या चेक नाक्यांवर तस्करांचे हप्ते ठरलेले आहेत. जत तालुक्यातील अनेक चेक नाक्यांवर काही जण कित्येक वर्षे ठाण मांडून आहेत. तेथून त्यांची बदलीही होत नाही. बदली झाल्यास गॉडफादरच्या आशीर्वादाने ती पुन्हा रद्द होते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असणार्‍या धार्मिक स्थळांमध्ये नेवैद्य म्हणूनही गांजा दिला जातो. यातूनच देवाचा प्रसाद म्हणूनही गांजाचे सेवन करण्याची प्रथा सुरू झाल्याची चर्चा आहे. यातूनही अनेकांना या नशेची सवय लागली आहे. 

हवाई सर्वेक्षणाद्वारे कारवाई शक्य...

बहुतांशी मोठ्या शेती क्षेत्रात गांजाची लागवड केली जाते. ऊस, झेंडूसारख्या पिकात आंतरपीक म्हणून त्याची लागवड केली जाते. त्यामुळे सहसा गांजाचे पीक दृष्टीस पडत नाही. त्यामुळे आता पोलिस आणि महसूल प्रशासनाने गांजा उत्पादन कल्या जाणार्‍या भागात ड्रोन कॅमेर्‍याद्वारे हवाई सर्वेक्षण करून मोठ्या प्रमाणात कारवाई करणे शक्य होणार आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकार्‍यांनी संयुक्त पथकाद्वारे अशी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

पंधरा वर्षात एकही मोठी कारवाई नाही...

2003 मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक अशोक कामटे यांनी जत तालुक्यात गांजाने भरलेले दोन ट्रक पोलिसांनी जप्त केले होते. त्यावेळी गॉडफादरला चांगलाच चापही लावण्यात आला होता. मात्र त्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकही मोठी कारवाई झालेली नाही. त्यानंतर गतवर्षी कुंडल येथे शंभर किलो गांजा पकडण्यात आला होता. एवढीच काय ती मोठी कारवाई. उमदी पोलिसांकडूनही  जुजबी कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे. 

गुटखा, माव्यातही गांजाचा वापर

चांगली किक तसेच ग्राहक मिळावेत यासाठी बनावट गुटखा तयार करणारे,तसेच काही ठिकाणी माव्यामध्येही गांजाचे पाणी वापरले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्राहकांकडून गुटखा, मावा ठराविक ठिकाणीच घेतला जातो. माव्यात गांजाचे पाणी वापरल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील एका पानपट्टीवर कारवाई करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात मात्र असे होत नाही.

सेवन, बाळगल्यास सात वर्षांची शिक्षा...

गांजा जवळ बाळगला अथवा त्याचे सेवन केले तर कायद्यात कडक शिक्षेची तरतूद आहे. अशांना किमान सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. गांजा ओढल्याचे आढळल्यास संबंधिताची शासकीय रुग्णालयात तपासणी केली जाते. त्यामध्ये गांजाचा अंश आढळल्यास त्याच्यावर अंमली पदार्थ सेवन विरोधी कायद्यानुसार कारवाई केली जाते. मात्र किरकोळ कारवाई वगळता आतापर्यंत ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळेच शहरांसह ग्रामीण भागात गांजाची खुलेआम विक्री सुरू आहे. 

चिलीम, सिगारेटमधून केली जाते नशा...

गुन्हेगारांसह नशेबाजांकडून चिलीम अथवा सिगारेटमध्ये गांजा भरून त्याची नशा केली जाते. या नशेमुळे कित्येक तास नशेबाज गुंगीत राहतो. अनेक गुन्हेगारांनी गांजाच्या नशेतच खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे केल्याची उदाहरणे आहेत. या नशेमुळे मोठी भूक लागत असल्यानेही काही गांजा ओढतात. मात्र गांजाच्या अतिसेवनाने फुफ्फुसाचे गंभीर आजार होऊ शकतात.

नशेव्यतिरिक्त अन्यही वापर...

गांजा, अफूचा पूर्वीपासूनच नशेसाठी वापर केला जात आहे. मात्र पूर्वी अनेकदा रडणार्‍या लहान मुलांना अगदी अल्प प्रमाणात अफू दिलाी जात असे. शिवाय चारा न खाणार्‍या जनावरांनाही भाकरीतून गांजाची गोळी दिली जात होती. गांजा सेवनाने भूक वाढते असा समज असल्याने दुभती जनावरे अधिक चारा खाऊन अधिक दूध देतील या आशेनेही त्यांना गांजा दिला जात होता. गांजाची  नशा करणारा एका अनामिक भीतीत राहतो असेही याचे सेवन करणार्‍यांचे म्हणणे आहे.