Thu, Jul 18, 2019 20:56होमपेज › Sangli › जिल्हा बँकेच्या भरतीत आचारसंहितेचा अडसर

जिल्हा बँकेच्या भरतीत आचारसंहितेचा अडसर

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 10:53PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या लांबलेल्या नोकरभरतीला सांगली महापालिका निवडणूक आचारसंहितेने आणखी लांबणीवर टाकले आहे. जिल्हा बँकेला नोकरभरतीस मान्यता मिळाल्यापासून निवडणूक आचारसंहितेचा हा चौथा ‘ब्रेक’ आहे. 

सांगली जिल्हा बँकेस सप्टेंबर 2016 मध्ये शासनाने कर्मचारी भरतीस मान्यता दिलेली आहे. बँकेने सहकार विभागाला कर्मचारी आकृतीबंध सादर केला होता. बँकेच्या 1 हजार 442 पदांच्या कर्मचारी आकृतीबंधला शासनाने मान्यता दिली आहे. सध्या 925 कर्मचारी कार्यरत असून 517 रिक्त पदे आहेत. रिक्त 517 पैकी सुमारे 300 पदांवर भरती होईल, असे सांगितले जात होते.  सहकार विभागाने जिल्हा बँकेस कर्मचारी भरतीस मान्यता दिल्यानंतर त्याअनुषंगाने हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आणि नोकरभरतीची प्रकिया थंडावली.

काही कालावधीनंतर नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीच्या आचारसंहितेने नोकरभरतीच्या हालचाली पुन्हा थंडावल्या. त्यानंतर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आता सांगली महानगरपालिकेची आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी दि. 1 ऑगस्टला मतदान आहे.  

दि. 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी आहे. त्यानंतर नोकरभरतीच्या हालचाली सुरू होतील.  कर्मचारी भरतीस निवडणुकांची आचारसंहिता आड येत असली तरी भरती रखडण्यास अन्य काही कारणेही आहेत. अन्य जिल्हा बँकांनी केलेली नोकरभरती वादग्रस्त ठरलेली. शासनाने भरतीला स्थगिती दिली. त्यामुळे सांगली जिल्हा बँकेने अवलंबलेला सावध पवित्राही भरती रखडण्यास कारणीभूत ठरलेला आहे.