Sat, Mar 23, 2019 00:27होमपेज › Sangli › मिरजेत मध्यवर्ती भागातच समस्या

मिरजेत मध्यवर्ती भागातच समस्या

Published On: May 26 2018 12:51AM | Last Updated: May 25 2018 7:54PMमिरज : जे. ए. पाटील

शहराच्या मध्यवस्तीत असलेला प्रभाग क्र. 6 पिण्याचे दूषित पाणी, ड्रेनेज आणि आरोग्य विषयक अनेक समस्यांनी त्रस्त आहे. याच प्रभागात शहराचे वैभव असलेल्या लक्ष्मी मार्केटची ऐतिहासिक वास्तू आहे. मात्र या वास्तूच्या नूतनीकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या वास्तूची पडझडही होत आहे.   मिरजेत प्रभाग क्रमांक 6 मध्ये ओबीसी खुला प्रवर्ग, सर्वसाधारण महिला (2), खुला प्रवर्ग अशी चार आरक्षणे आहेत. महापालिकेने 1998 मध्ये मिरज - बेडग रस्त्यावर अत्याधुनिक कत्तलखाना बांधला, परंतु अद्यापही या प्रभागात काही ठिकाणी जनावरांची कत्तल होते. उघड्यावर मांस विक्री होत असल्याने आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर आहे. या भागातील ड्रेनेज कायम तुंबलेले असतात. गेल्या काही वर्षात ड्रेनेजची नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. परंतु समस्या मात्र पूर्णपणे सुटलेली नाही. दरवर्षी या भागातील नागरिकांना अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांना सामोरे जावे लागते. या भागात मोकाट कुत्र्यांचाही सुळसुळाट आहे. परंतु पालिकेकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही.

मध्यवर्ती ठिकाण लक्ष्मी मार्केटची ऐतिहासिक वास्तू या प्रभागात आहे. संस्थान काळात बांधलेली ही देखणी वास्तू आहे. पण देखभाल दुरुस्ती अभावी या वास्तूची दुरवस्था होऊ लागली आहे. मार्केटच्या आतील बाजूस भाजीपाला विक्रेत्यांची सोय आहे. तथापि आतील सर्व जागा व्यापार्‍यांनीच बळकावल्याचे दिसून येते. काही वर्षांपूर्वी महापालिकेने 50 लाख रुपये खर्चून भाजी विक्रेत्यांसाठी कट्टे बांधले, परंतु काही व्यापार्‍यांच्या मक्तेदारीमुळे  भाजी विक्रेत्यांना पुन्हा रस्त्यावरच व्यवसाय करावा लागत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असलेला मीरासाहेब दर्गाही याच प्रभागात आहे.   तीर्थक्षेत्र म्हणून दर्गा परिसराचा विकास रखडला आहे.  ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कालबाह्य झाली आहे.  राजकीय कार्यकर्त्यांचा प्रभाव असलेल्या या प्रभागात समस्याही  प्रभावी आहेत.  धार्मिक स्थळांचीही संख्या जास्त आहे. परंतु या स्थळांच्या परिसरातील स्वच्छताही केली जात नाही.

समस्या प्रभागाच्या

परिसर : लक्ष्मी मार्केट, मीरासाहेब दर्गा, सांगली वेस, जवाहर चौक, गोठण गल्ली, सौदागर गल्‍ली, मोमीन गल्ली, नदाफ गल्ली, कुरेशी गल्ली, पाटील गल्ली, ढोर गल्ली, धनगर गल्ली, खाटीक गल्ली, बुरुड गल्ली.