Fri, Apr 26, 2019 15:34होमपेज › Sangli › खासगी प्राथमिक ३५ शिक्षकांच्या मान्यता वादात

खासगी प्राथमिक ३५ शिक्षकांच्या मान्यता वादात

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 28 2018 12:42AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित व अल्पसंख्यांक प्राथमिक शाळातील 35 शिक्षक व 1 लिपिकाची मान्यता वादात अडकली आहे. आयुक्‍त कार्यालयाकडून या मान्यतांच्या पडताळणीत प्रथमदर्शनी अनियमितता दिसून आली होती. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांच्याकडे सुनावणी झाली आहे. रोष्टर डावलून मान्यता दिल्याचे आढळून आल्यास मान्यता रद्द होतील, असे गोंधळी यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सन 2013 व 2014 या कालावधीत दिलेल्या 35 शिक्षक आणि 1 लिपिकाच्या मान्यताप्रकरणी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था, शिक्षणाधिकारी यांना सुनावणीसाठी नोटीस बजावली होती. आयुक्‍त कार्यालयाच्या पडताळणीत तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या या मान्यतांमध्ये प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. या मान्यता रद्द का करू नये, असे नोटीसमध्ये म्हटले होते. त्यावर दि. 16 फेब्रुवारी 2018 रोजी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सुनावणी झाली आहे. 

शिक्षणाधिकार्‍यांना निलंबित नकेल्यास आंदोलन : शेतकरी संघटना 

शिक्षक मान्यता अनियमिताप्रकरणी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुनील फराटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 35 शिक्षक व 1 लिपिकाची मान्यता संशयास्पद आहे. भरतीबंदी कालावधीत तसेच रोष्टर डावलून मान्यता दिल्या आहेत. 

भरती योग्य पद्धतीने झालेली नाही. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांना निलंबित न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर शेतकरी संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे म्हणाल्या, वैयक्‍तिक मान्यता नियमानुसार आहेत. मान्यतांमध्ये अनियमितता झालेली नाही. शिक्षण उपसंचालक यांच्याकडील  सुनावणीवेळी लेखी खुलासा दिला आहे.