Thu, Apr 25, 2019 17:55होमपेज › Sangli › पक्षबांधणीला प्राधान्य : जयंत पाटील

पक्षबांधणीला प्राधान्य : जयंत पाटील

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:01PMइस्लामपूर : वार्ताहर

लोकसभा निवडणुकीआधी राज्यात  पक्ष बांधणीला प्राधान्य देणार आहोत. तळागाळापर्यंत पोहोचलेला राष्ट्रवादी पक्ष आणखी मजबूत करू . पक्षाचे नेते छगन भुजबळ हेही लवकरच पक्षात सक्रीय होतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत अद्याप विचार केला नसल्याचे सांगून  जयंत पाटील म्हणाले, बुथ कमिट्यांच्या माध्यमातून पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला आहे. त्याला आणखी बळकटी देणार आहोत. पक्षांतर्गत पदाधिकार्‍यांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नव्या पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून बुथ कमिट्या आणखीन मजबूत करू. प्रशिक्षण देऊन सक्षम कार्यकर्ते तयार करू. ही प्रक्रिया येत्या 2-3 महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर निवडणुकीच्या तयारीला लागू. त्याआधी संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा पूर्ण करणार आहोत. 

अरुणअण्णांशी चर्चेनेच पाठिंबा...

पालघर व पलूस- कडेगावमध्ये राष्ट्रवादीने काँगे्रसला पाठिंबा दिल्याचे सांगून आमदार पाटील म्हणाले, अरुणअण्णा लाड यांच्याशी चर्चा करूनच, त्यांना विश्‍वासात घेऊनच  पलूस- कडेगावमध्ये डॉ. विश्‍वजित कदम यांना पक्षाने पाठिंबा दिला आहे. ते विजयी होतील, यात शंका नाही. भाजपची या निवडणुकीत काय भूमिका राहील, याची मला काहीच माहिती नसल्याचेही ते म्हणाले.कर्नाटकातील निवडणुकीबाबत ते म्हणाले, तेथे काँगे्रस सरकारबद्दल जनतेत कोठेही नाराजी दिसून आली नाही. भाजप-काँगे्रसमध्ये सरळ लढत होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनेही मराठी मतांच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तेथे काँगे्रसलाच यश मिळेल, अशी आशा आहे. 

भुजबळ सक्रीय होतील...

ते म्हणाले, छगन भुजबळ तब्येत बरी झाली, की  पक्षात सक्रीय होतील. उद्या मुंबईत त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे.  बीडसह राज्यातील इतर पोट निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. बीडमध्ये जगदाळे हेच आमचे उमेदवार असल्याचेही ते म्हणाले. कराड यांनी का माघार घेतली, हे अद्यापही समजले नाही.