Thu, Jul 18, 2019 12:17होमपेज › Sangli › कुमसगेच्या बीअर शॉपीवर छापा

कुमसगेच्या बीअर शॉपीवर छापा

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 24 2018 1:09AMसांगली : प्रतिनिधी

वाहतूक पोलिस समाधान मांटे यांच्या खूनप्रकरणातील संशयित कुमार कुमसगे याच्या विश्रामबाग येथील रत्ना बीअर शॉपीवर सोमवारी पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या  पथकाने छापा टाकला. यामध्ये लाखो रुपयांचा बीअरसाठा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी बीअर, वाईन व कोल्ड्रिंक्सचाही साठा जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत या साठ्याची मोजणी सुरू होती. मांटे यांच्या खूनप्रकरणात पुरावा नष्ट केल्याप्रकरणी हॉटेल रत्ना डिलक्सचा मालक कुमार कुमसगे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या मालकीची ही बिअर शॉपी आहे. विश्रामबाग पोलीस वसाहतीसमोर  बियर शॉपी, तर तळघरात दोन गोदाम आहेत. याठिकाणी बेकायदा बिअर साठा असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. 

आषाढी एकादशीनिमित्त आज ड्राय डे होता. त्यामुळे बियर शॉपी बंद होती. पोलिसांनी गोदामाचे कुलूप तोडून तपासणी केली. त्यावेळी दोन्ही गोदामात बियरचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. याशिवाय वाईन व कोल्ड्रींक्सचा साठाही साडला. तोही जप्त करण्यात आला. या कारवाईची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांचे पथक दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचे पथक या साठ्याची मोजणी करीत होते.गेल्याच आठवड्यात कुमसगेच्या हॉटेल रत्ना डिलक्समध्ये समाधान मांटे यांचा खून झाला होता. या खूनप्रकरणी कुमसगेला अटक झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेलचा तसेच परमिट रुमचा परवाना रद्द केला आहे. उपअधीक्षक विरकर, उपनिरीक्षक दादासाहेब बुधावले, हवालदार दिनेश माने, सिकंदर तांबोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

सर्व साठा बेकायदा...

हा सर्व साठा बेकायदेशीर आहे. कुमसगे याच्या नावावर बीअर शॉपीचा परवाना आहे. तोे कदाचित बाहेर याची विक्री करीत असावा, असा संशय आहे. तपासातून या बाबीचा उलगडा केला जाईल. कुमसगे याने आणखी कोठे साठा केला आहे का, याचा तपास सुरू असल्याचे उपअधीक्षक  वीरकर यांनी पत्रकारांना सांगितले.