होमपेज › Sangli › ‘पंतप्रधान घरकुल’ मनपाने अडविली

‘पंतप्रधान घरकुल’ मनपाने अडविली

Published On: Feb 18 2018 2:02AM | Last Updated: Feb 17 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

प्रत्येकाला सन 2020 पर्यंत हक्काचे घर देण्यासाठी पंतप्रधान घरकुल योजना केंद्र शासन राबवत आहे. परंतु ही योजना ढिसाळ कारभार करीत महापालिका प्रशासनाने गेल्या दोन वर्षांपासून सर्व्हेतच जाणीवपूर्वक अडविली आहे. यामुळे योजनेचे काम ठप्पच असल्याचा आरोप स्वाभिमानी विकास आघाडीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे यांनी पत्रकार बैठकीत केला. या कारभाराविरोधात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे ठोकळे यांनी सांगितले. 

ते म्हणाले, केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सांगली महापालिकेची निवड केली आहे. ही योजना सन 2016 पासून सुरू झाली असून सन 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेचे राज्य प्रकल्प संचालक निर्मल देशमुख यांनी ही योजना राबविण्यासंदर्भात 3 फेबु्रवारी 2016 ला महापालिकेला कळविले. मात्र महापालिकेने ही योजना राबविण्यास विलंब केला. योजनेसाठी सुमारे शंभर कोटींचा अंदाज गृहित धरून महापालिकेने मुंबई येथील दाराशॉ ऍन्ड कंपनीला ठेका दिला आहे. 

ठोकळे म्हणाले, कंपनी व मनपामध्ये झालेल्या करारानुसार प्रत्येक घराच्या सर्व्हेला 35 रुपये, बायोमेट्रिक सर्व्हेला प्रत्येक घरासाठी 100 रुपये व शासनाकडे प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी 4 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली आहे. मनपा क्षेत्रात 17 हजार 300 अर्जांची विक्री झाली आहे. मात्र केवळ सात ते आठ हजार अर्ज दाखल झाले आहेत. 

ते म्हणाले, कंपनीने अर्जाची छाननी करून वर्गवारी केलेली नाही. कंपनीने सर्व्हेच्या मोबदल्यासाठी काम थांबविले आहे. त्यामुळे या योजनेला खीळ बसत आहे. उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली चार अधिकार्‍यांचे कक्ष स्थापन करणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. 

ठोकळे म्हणाले, महापालिकेच्या अधिकार्‍यांना या योजनेचे व नागरिकांचे देणे घेणे नाही. केवळ महापालिकेचा पगार घेवून स्वत:चा विकास करायचा आहे. अशा अधिकार्‍यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे.