Tue, Jul 16, 2019 09:59होमपेज › Sangli › महासभेच्या माध्यमातून माझ्यावर दबाव

महासभेच्या माध्यमातून माझ्यावर दबाव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सर्वच कामे मार्गी लागूनही महासभेच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू आहे. आयुक्‍त व प्रशासनाला टार्गेट करून सुरू असलेल्या कारभाराबद्दल मी शासनाकडे अहवाल पाठविला आहे, असे आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

शनिवारी महासभेत आयुक्‍तांना परत पाठविण्याच्या मागणीपर्यंतच्या  घटनांचा त्यांनी समाचार घेतला. मी चुकलो असेल तर परत जाण्यास तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खेबुडकर म्हणाले, अठरा तास कामे करून सर्वच सदस्यांची कामे मार्गी लावली. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या ड्रेनेज, पाणीपुरवठ्यासारख्या योजना गतिमान केल्या. प्रत्येकवेळी विकासकामांच्या फाईली मी अडवत असल्याचे खोटे आरोप केले जातात. यासाठी आंदोलने, महासभांमध्ये चुकीची आगपाखड होते, हे योग्य नाही. गेल्या दोन वर्षांत मी 5 हजार 192 फाईल्स मार्गी लावल्या आहेत. त्यातून सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक कामे झाली. ही सर्व आकडेवारी 28 फेब्रुवारीअखेरची आहे. 

ते म्हणाले, जे विष्णू माने आरोप करतात, त्यांच्या प्रभागात 6.14 कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रभागात 4.15 कोटी, तर जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रभागात 4.50 कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. आता फक्‍त जुन्या सात फाईल माझ्याकडे प्रलंबित आहेत. त्याही मी लवकरच मार्गी लावतो, असे सांगितले आहे. 

खेबुडकर म्हणाले, काही नगरसेवकांनी माझ्याकडे आलेल्या फाईलमध्ये अडचणी आणि अयोग्य कामे असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. एका नेत्याची फाईल त्रुटीमुळे मी अडविली आहे. ती बंद केली आहे.

ते म्हणाले, मी कोणाची फाईल आहे, हे बघत नाही. फक्‍त नकाशा आणि फोटो एवढेच पाहतो. अंदाजपत्रकाची जबाबदारी ही शहर अभियंत्यांवर असते. त्यात जर काही चुका असतील तर त्यांच्यावर कारवाई करू. आकांडतांडव कशासाठी सुरू आहे, ते मला काही माहीत नाही. नाहक बदनामीचे षड्यंत्र योग्य नाही. या सर्वाचा सविस्तर अहवाल शासनाकडे दिला आहे. शासनच  निर्णय घेईल.

Tags : Pressure on me through the General Assembly says Commissioner Ravindra Khebudkar


  •