Mon, Jul 22, 2019 05:15होमपेज › Sangli › मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज

मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज

Published On: Aug 01 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 10:51PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 1) होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी  यंत्रणा सज्ज झाली आहे. तीनही शहरात सुमारे 544 मतदान केंद्रांवर होणार्‍या मतदानासाठी सुमारे 3 हजार 604 अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांनी मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षित ठेवलेले ईव्हीएम मशीन तपासणी करून ताब्यात घेतले. येथील तरुण भारत स्टेडियम, महापालिका इमारतीसह शहरात सहा निवडणूक अधिकार्‍यांंनी यावर कंट्रोल ठेवला आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे निरीक्षक डॉ. पी. अनबलगन व मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्‍त डॉ. रविंद्र खेबुडकर यांनी काटेकोर नियोजनाखाली ही व्यवस्था सज्ज ठेवली आहे.

याबाबत खेबुडकर म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने महापालिका निवडणुकीसाठी यंत्रणेची कसरत सुरू होती. याअंतर्गत अर्ज भरण्यासाठी तीन शहरात सहा निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयांतून कामकाज सुरू होते. यामध्ये आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यापासून आचारसंहिता कक्ष, भरारी पथकाद्वारे हे कामकाज सुरू होते. प्रचार यंत्रणेच्या समाप्तीपर्यंत यावर अंकुश ठेवून आता मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यानुसार शहरात त्याच पद्धतीने 544 मतदान केंद्रांचे नियोजन ठेवण्यात आले आहे. यासाठी या सर्वच अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली ज्या-त्या प्रभागाच्या मतदानासाठी ईव्हीएम मशीन तपासून सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहरात या 544 मतदान केंद्रांची सुसज्जता ठेवण्यात आली आहे. 

ते म्हणाले, उद्या होणार्‍या निवडणुकीसाठी आज प्रत्येक केंद्रांचा ताबा घेण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या. त्यांच्याकडे ईव्हीएम मशीन तपासून सील करून दिले आहेत. ही मशीन व संपूर्ण सुविधा मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी 40 बसेस, 14 जीप व 6 स्कूल बसेसची व्यवस्था केली आहे. प्रत्येक केंद्रात मुख्य अधिकारी, दोन सहाय्यक अधिकारी एक शिपाई, एक पोलिस अशी व्यवस्था आहे. सर्व मतदान केंद्रे आदर्श करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या टीमकडून थर्डपार्टी ऑडिट करून घेतले होते. त्यापैकी 244 केंद्रे आदर्श ठरली आहेत. उर्वरित केंद्रेही सुसज्ज केली आहेत. शाळा-महाविद्यालयासह विविध इमारतींमध्ये ही केंद्रे आहेत. त्या केंद्रांवर मतदारांना भयमुक्‍त, उत्साही वातावरण वाटावे अशी व्यवस्था ठेवली आहे. एकूण 297 मतदान केंद्रांमध्ये रेड कार्पोट टाकण्यात येणार आहेत. रांगोळी, फुलांची सजावटही करण्यात येईल. प्रत्येक केंद्रात पहिल्या  पाच मतदारांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाईल. 

मतदान वेळेनंतरही सुरूच राहणार

खेबुडकर म्हणाले, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाचा कालावधी आहे. परंतु प्रत्येक मतदाराला 4 जणांना मतदान द्यावयाचे आहे. त्यानुसार ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे चिन्ह पाहून बटण दाबणे तसेच प्रक्रिया पूर्ण होण्यास सुमारे सव्वा ते दीड मिनीट लागेल. अपंग, वृद्धांना यापेक्षाही अधिक विलंब लागेल. एकूणच हा कालावधी पाहता नियोजित वेळेपेक्षा जास्त लागू शकतो. त्यामुळे सायंकाळी 5.30 पर्यंत जे मतदार केंद्रांमध्ये रांगेत असतील त्यांना चिठ्ठ्या देऊन मतदान केंद्राचे दार बंद केले जाईल. सर्व मतदान पार पडल्यानंतरच  त्या केंद्राचे कामकाज संपेल. ते सर्व मशिन सील करून तत्काळ मिरजेच्या वेअर हाऊसमध्ये हलविण्यात येतील. त्यासाठीही सुरक्षाव्यवस्था व 71 बसेसची व्यवस्था केली आहे. 

ते म्हणाले, सुमारे 150 हून अधिक केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. त्यावर पोलिस फौजफाटा अधिक लक्ष देऊन असेल. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह टीमच्या सहाय्याने प्रशासन मतदान प्रक्रियेचे शिवधनुष्य चोख व निर्विघ्नपणे पार पाडेल. यावेळी निवडणूक अधिकारी तथा उपायुक्‍त सुनील पवार, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे आदी उपस्थित होते.

अशी असेल मतदान यंत्रणा 

रविंद्र खेबुडकर म्हणाले, तीन शहरात 544 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये 750 जणांचे मतदान होणार आहे. त्यासाठी ईव्हीएम मशिनचे 544 कंट्रोल युनिट तर 706 बॅलेट युनिट असणार आहेत. तीन शहरात 18 प्रभागांसाठी अ, ब, क व ड प्रवर्गातून प्रत्येकी एकाला मतदान करावयाचे आहे. सांगलीवाडीतील प्रभाग 13 व मिरजेतील प्रभाग 20 मध्ये तीन सदस्यीय प्रभागात अ, ब, क प्रवर्गानुसार प्रत्येकी मतदान करावयाचे आहे. त्यामुळे 18 प्रभागात 4 तर दोन प्रभागात तीन मतदान दिल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होऊन मतदान गृहित धरले जाणार नाही. मतदान कसे करावयाचे तसे केंद्र क्र. 2 व तीनचे अधिकारी तेथे मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

मतदान प्रक्रियेचा लेखाजोखा 

खेबुडकर म्हणाले, एकूण 20 प्रभाग, 78 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.  यासाठी 451 उमेदवार रिंगणात आहेत.  त्यासाठी 544 मतदान केंद्रे असून 3 हजार  60 अधिकारी, कर्मचारी, 544 पोलिस, एकूण 3 हजार 604 जणांचा स्टाफ तैनात करण्यात आला आहे. एकूण 4 लाख 24 हजार 179 मतदार (पुरुष - 2 लाख 15 हजार 547, महिला 2 लाख 8 हजार 595, इतर 37) आहेत. दहा टक्के स्टाफ राखीव ठेवण्यात आला आहे. शिवाय 6 निवडणूक अधिकार्‍यांच्या कक्षाअंतर्गत 6 महिला अधिकारी, कर्मचारी असलेली स्वतंत्र मतदान केंद्रेही सज्ज आहेत. या मतदान केंद्राचे कामकाज हे  महिलांंकडूनच चालेल.