Sat, Apr 20, 2019 16:39होमपेज › Sangli › आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवा

आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवा

Published On: May 12 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 11:03PMसांगली : प्रतिनिधी

पावसाळ्याच्या  पार्श्‍वभूमीवर प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा. त्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांनी तालुकानिहाय बैठका घ्याव्यात.   आपत्ती निवारणाचे सर्व साहित्य सज्ज ठेवावे. अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी शुक्रवारी येथे दिल्या.

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात आयोजित  आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, वाळवा उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, वारणा आणि कृष्णा नदीकाठची मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यातील 107 गावे संभाव्य पूरबाधित आहेत. या गावांमध्ये 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावा. उपाययोजना करुन  आवश्यक आपत्ती निवारणाचे सर्व साहित्य सज्ज ठेवावे. धोकादायक  इमारतीबाबत वेळीच कार्यवाही करावी.   पूर बाधीत लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबत   नियोजन करावे. 

या काळात धरणातील पाणीसाठा, धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, धरणातील विसर्ग, नदीच्या पुराची पातळी आणि त्यामुळे पाण्याखाली येणारी गावे  यांची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाने लोकांच्या माहितीसाठी वेळोवेळी द्यावी. आरोग्य विभागाने संभाव्य पूर परिस्थितीत आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी.    दुर्घटना घडल्यास कृषि किंवा वीज विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळेत मदत आणि नुकसानभरपाई देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.   सर्व विभागांनी त्यांच्या स्तरावर  दि. 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा.   पूर परिस्थितीमुळे होणार्‍या नुकसानीचे पंचनामे करण्याकरिता पथक सज्ज ठेवावे.