Thu, Jul 18, 2019 16:49होमपेज › Sangli › दहावी, बारावीनंतरच स्पर्धा परीक्षेची तयारी करा : हर्षद लवंगारे 

दहावी, बारावीनंतरच स्पर्धा परीक्षेची तयारी करा : हर्षद लवंगारे 

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 8:29PMसांगली : प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पदवी पूर्ण असण्याची पात्रता आहे. मात्र त्याची तयारी दहावी, बारावीनंतर सुरू करा. कष्ट करण्याची तयारी, जिद्द यामुळे त्यात हमखास यश मिळेल, असे प्रतिपादन पुणे येथील युनिक अ‍ॅकॅडमीचे हर्षल लवंगारे यांनी  केले. 

विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत व पॉवर्ड बाय पिसीईटी आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ‘पुढारी - एज्यु-दिशा 2018’ शैक्षणिक प्रदर्शन येथील कच्छी जैन सेवा समाज भवनमध्ये सुरू आहे. यात लवंगारे ‘दहावी, बारावीनंतरच्या स्पर्धा परीक्षेची  तयारी’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून  खूप संधी आहेत. त्यातून तुम्हाला देशसेवा आणि समाजसेवा करता येते. मान्यताप्राप्त पदवी असलेल्यांना स्पर्धा परीक्षा देता येते. युपीएससी ही राष्ट्रीय पातळीवर तर एमपीएससी ही राज्यपातळीवर परीक्षा घेते. अभ्यासक्रम समजून घ्या. अगोदर मुलाखत, मुख्य परीक्षेची तयारी करा. कारण मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीची तयारी करण्यासाठी वेळ खूप कमी असतो. 

लवंगारे म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी भौगोलिक, ऐतिहासिक वारसा, वैशिष्ट्ये यांची माहिती,  तुमचे जनरल नॉलेज या गोष्टी पाहिल्या जातात. सर्वांगीण माहितीसाठी दैनिकांचे वाचन नियमित करा. मनात न्यूनगंड बाळगू नका. चिकाटी, जिद्द याच्या जोरावर हमखास यश मिळते.

प्रदर्शनात आज होणारी व्याख्याने 

वेळ : सकाळी 11.00 ते 12.00, वक्‍ते : प्रा. डॉ. सुनील देशपांडे (मराठवाडा मित्रमंडळ, पुणे), विषय : इंजिनियरिंग क्षेत्रातील संधी., दु. 12.00 ते 1.00, वक्‍ते : साहिल चोपडे (संचालक, शाखा टी.एम.सी. शिपिंग प्रा. लि.), विषय : मर्चंट नेव्हीमधील करिअर., सायंकाळी 5.00 ते 6.00, वक्‍ते : प्रा. डॉ. नितीन सावगावे (संचालक, विश्‍वेश्‍वरय्या टेक्निकल कॅम्पस्, भोसे), विषय : इंजिनिअरिंग व इंडस्ट्रीजमधील करिअरच्या संधी., सायंकाळी 6.00 ते 7.00, वक्‍ते : प्रा. डॉ. विनोद बाबर (व्यवस्थापकीय संचालक, कृष्णा फाऊंडेशन, कृष्णा विद्यापीठ), विषय : यशाचा शिवमंत्र.

कोणते माध्यम आहे याचा बाऊ करू नका

हर्षल लवंगारे म्हणाले, शिक्षण घेताना तुमचे  माध्यम  मराठी की इंग्रजी आहे , हे फार महत्त्वाचे नाही. तुम्ही मराठीतून शिक्षण घेतले असल्याचा बाऊ करू नका. आता युपीएससीलाही मराठी माध्यमाची अनेक मुले उत्तीर्ण होताना दिसत आहेत. भाषा हे केवळ संवादाचे एक माध्यम आहे.