Thu, Jul 18, 2019 08:26होमपेज › Sangli › लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागांवर तयारी करा

लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागांवर तयारी करा

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 04 2018 1:19AMसांगली : प्रतिनिधी

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, भाजप हा मुख्य राजकीय शत्रू मानून लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याच्या द‍ृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत जयंत पाटील यांनी तालुकानिहाय बुथ कमिट्यांचा आढावा घेतला. पाटील म्हणाले, कॉँग्रेसकडून लोकसभा व विधानसभेच्या काही जागांबाबत अपेक्षा व्यक्त होत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कशा लढवायच्या हे ठरले नसले तरी भाजप हा मुख्य राजकीय शत्रू आहे, हे समजून पदाधिकारी  व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावेे. 

पाटील म्हणाले, बुथ कमिट्या सक्षम कराव्यात. बुथ कमिट्यांद्वारे प्रत्येक तालुक्यात आणि त्यामाध्यमातून जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी करावी. पक्षाला भविष्यात त्याचा फायदा निश्‍चितपणे होणार आहे. बुथ कमिट्यांबाबत अजूनही चांगले काम अपेक्षित आहे. दि. 15 सप्टेंबरपर्यंत बुथ कमिट्यांबाबतची कामे पूर्ण करावीत. 

ते म्हणाले, गणेशोत्सव झाल्यानंतर पक्षाचा जिल्हास्तरीय मेळावा/शिबीर घेण्यात येईल. त्यामध्ये भविष्यातील राजकीय रणनीतीविषयी चर्चा होईल.  जिल्ह्यात राष्ट्रवादीची ग्रामीण फळी अत्यंत मजबूत आहे.  ती आणखी मजबूत केली तर भाजपचा टिकाव लागणार नाही. गाफील राहिल्यामुळे अनेकदा आपले नुकसान होते. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागावे. प्रत्येक तालुक्यातील कामाचा आढावा पुढील महिन्यात पुन्हा घेण्यात येईल. 

दिलीप पाटील, प्रकाश शेंडगे गैरहजर

राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारीपदी  जिल्ह्यातील नऊ नेत्यांची निवड झालेली आहे. जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित नव्हते.  

स्वीकृतसाठी इच्छुकांची गर्दी 

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी सोमवारी जवळपास 15 जणांनी जयंत पाटील यांची भेट घेतली. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. काही इच्छुकांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले.

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी आमदार मानसिंग नाईक, अरूणअण्णा लाड, इलियास नायकवडी, सुरेश पाटील, ताजुद्दीन तांबोळी, चिमण डांगे, हणमंत देसाई, कमलाकर पाटील, देवराज पाटील, आप्पासाहेब हुळ्ळे, बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे भरत देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील, शंकरदादा पाटील,  अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, सुरेश शिंदे, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पोलेशी, अ‍ॅड. बसवराज धोडमणी, आनंदराव पाटील, दत्तात्रय पाटील, भीमराव पाटील-कणेगावकर, प्रमोद इनामदार उपस्थित होते.