Tue, Apr 23, 2019 22:38होमपेज › Sangli › मिरजेत वैयक्तिक आघाडीसाठी हालचाली

मिरजेत वैयक्तिक आघाडीसाठी हालचाली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मिरज : जालिंदर हुलवान

मिरज शहरामध्ये महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सर्वत्र चर्चा फक्त महापालिका निवडणुकीचीच सुरू आहे. भाजप, शिवसेना, दोन्ही काँग्रेस, मनसे असे पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत. असे चित्र जरी समोर दिसत असले तरी वैयक्तिक आघाडी करण्याचा ‘प्लॅन’ काही इच्छुकांमध्ये सुरू आहे.       

महानगरपालिका अस्तित्वात येऊन 20 वर्षे झाली.  मिरजेला अनेक पदे वाट्याला आली. पदांसाठी आणि सोयीस्करपणे राजकारण करण्यात मिरजेतील काही नेते पटाईत आहेत.   निवडणुका आल्या की विकासकामे सुरू होतात. त्याच पध्दतीने सध्या मिरजेत कामे सुरू आहेत.   आता राज्यात आणि केंद्रात भाजप, शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार आहे. भाजपला महापालिका ताब्यात घ्यायची आहे. त्यादृष्टीने नेते तयारीला लागले आहेत. फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. आमदार सुरेश खाडे, मकरंद देशपांडे व अन्य कार्यकर्ते  यात व्यस्त आहेत.  काही नगरसेवकही भाजपच्या गळाला लागले आहेत.

शिवसेनेचे कार्यकर्ते  आहेत पण त्यांचा एकही नगरसेवक मिरजेत निवडून आला नाही. नगरसेविका अश्‍विनी कांबळे ह्या आता शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. मिरजेतून नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, संजय विभुते, तानाजी सातपुते व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. शिवसेनेकडूनही फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे.सध्या काँग्रेसची सत्ता महापालिकेत आहे. माजी मंत्री पतंगराव कदम व माजी मंत्री मदन पाटील या दोन बलाढ्य नेत्यांची मोठी ताकद काँग्रेसला  मिळत होती. मात्र आता ते दोघेही नाहीत. काँग्रेसची धुरा जयश्री मदन पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तरीही महापालिकेतील अनुभवी नेतृत्व म्हणून किशोर जामदार यांनाच हा गाडा पुढे न्यावा लागणार आहे. काँग्रेसची उमेदवारी घेऊन काहीजण नगरसेवक, सभापती, महापौर बनले. आता मात्र त्यापैकी काहींनी वेगळी चूल मांडण्याची तयारी केली आहे.

माजी महापौर इद्रीस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली काहींनी यापूर्वी मिरज संघर्ष समितीचे ‘हत्यार’ वापरले होते. याही निवडणुकीत तशी तयारी सुरू आहे. पूर्वी मिरज संघर्ष समिती होती आता मात्र महापालिका संघर्ष समिती तयार झाली आहे. तशी निवडणूक यंत्रणेकडून मान्यताही घेण्यात आली आहे.  संघर्ष समितीची भूमिका गुलदस्त्यात आहे.आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीने यापूर्वी सत्ता  मिळविली होती.  अजून  जयंत पाटील यांनी ‘एन्ट्री’ घेतली नाही. ते कधी एन्ट्री घेतात, याकडे अन्य पक्षांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी या निवडणुकीत आघाडी करावी, असा सूर यापूर्वी व्यक्त झाला होता. मात्र ही आघाडी  होईल, असे चित्र नाही. पालिकेच्या राजकारणात मिरज पॅटर्नची चर्चा नेहमी होते. या निवडणुकीत मिरज पॅटर्न राबविण्यासाठी मिरजेतील काही आजी-माजी नगरसेवक व इच्छुक कामाला लागले आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, मनसेचे दिगंबर जाधव यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Tags : Sangli, Sangli News ,Miraj city, Preparations,  municipal, elections, 


  •