Tue, Nov 20, 2018 13:31होमपेज › Sangli › प्रतीक पाटील अदखलपात्र : खा. संजय पाटील

प्रतीक पाटील अदखलपात्र : खा. संजय पाटील

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 8:08PMसांगली : प्रतिनिधी

वारणेच्या पाण्यावरून टीका करणारे प्रतीक पाटील पाच वर्षांनंतर निवडणुकीपुरते जागे झाले आहेत. त्यांनी माझ्यावर टीका करणे हास्यास्पद आहे. मुळात ते अदखलपात्र आहेत, असा पलटवार खासदार संजय पाटील यांनी केला. वारणेचे पाणी इचलकरंजीकरांना पिण्यासाठी गरजेचे आहे. त्याच पध्दतीने वारणाकाठचा तोटा होऊ नये ही सुध्दा गरज लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे दोघांचेही नुकसान होऊ नये यासाठी समन्वयाने तोडगा काढला पाहिजे. त्यासाठी पुढाकार घेऊ, असे ते म्हणाले.

इचलकरंजीला वारणेचे पाणी नेण्यावरून वाद पेटला आहे. यासंदर्भात खासदारांचे दुर्लक्ष असल्याची टीका प्रतीक पाटील यांनी केली होती. वारणेचे पाणी कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीला जाता कामा नये, अशी भूमिकाही जाहीर केली होती. त्याचा पाटील यांनी समाचार घेतला.ते म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांत प्रतीक पाटील कितपत कार्यक्षम आहेत हे समाज उघड्या डोळ्याने बघतो आहे.त्यामुळे त्यांची दखल घेण्याची गरज नाही. आता पाण्यासारख्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर राजकीय पोळी भाजण्याचा पोरकटपणा ते करीत आहेत. वास्तविक इचलकरंजी  काही देशाबाहेर नाही. तेथील लोकांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आग्रह सुरू आहे. दुसरीकडे वारणाकाठावरही पाणी कमी पडू नये, अशी दुसरी भूमिका आहे. समन्वयाने, चर्चेने विषय मार्गी लावला पाहिजे. 

इचलकरंजीला वर्षभरात अर्धा टीएमसीहून कमी पाणी दिल्याने  वारणा नदीचे पाणी काही संपणार नाही. याबाबत दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांशी चर्चा करू. त्या-त्या भागातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेऊ.