Wed, Apr 24, 2019 15:53होमपेज › Sangli › प्रभागरचना अहवाल आज निवडणूक आयोगाकडे

प्रभागरचना अहवाल आज निवडणूक आयोगाकडे

Published On: Mar 03 2018 1:44AM | Last Updated: Mar 03 2018 12:26AMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेची  प्रारूप निवडणूक रचना आणि प्रभाग आरक्षणावर शुक्रवारी प्रशासनाकडून पुण्यात शिक्कामोर्तब करण्यात आले. आयुक्‍त रविंद्र खेबुडकर आणि जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी निश्‍चित केलेल्या या आराखड्यात विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी काही किरकोळ दुरुस्ती करून तो कायम केला.  खेबुडकर  शनिवारी याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत. आयुक्त खेबुडकर यांनी अधिकार्‍यांसमवेत 2013 च्या लोकसंख्येनुसार प्रभागरचना आणि आरक्षित प्रभागही निश्‍चित केले आहेत. 

चार सदस्यीय 18 आहेत. याशिवाय एक त्रिसदस्यीय व एक पाच सदस्यीय असे एकूण 20 प्रभाग होणार आहेत.  यामध्ये 11 सदस्य अनुसूचित जाती आणि 29 सदस्य नागरिकांचा मागास प्रवर्गातील असतील. उर्वरित 40 सदस्य खुल्या प्रवर्गांतील असतील. एकूण 80 पैकी चाळीस सदस्य महिला असतील. परंतु कोणते  प्रभाग कसे जोडले आहेत, कोणते प्रभाग कसे आरक्षित होणार, विद्यमान कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट होणार याचीही उत्कंठा आहे. 

गेल्या दोन दिवसांत आयुक्त खेबुडकर व जिल्हाधिकारी पाटील यांनी गण व आरक्षणाचा आराखडा तयार केला. आयुक्त खेबुडकर यांनी त्याचा अहवाल आज विभागीय आयुक्त  दळवी यांना सादर केला. दळवी यांनी प्रारूप  रचना, आरक्षणांसह काही किरकोळ बदल सुचविले. खेबुडकर यांनी  ती दुरुस्ती करून प्रारूप प्रभागरचना अहवाल निश्‍चित केला. आयोग दि.13 मार्चपर्यंत अहवालाची पडताळणी करून तो महापालिकेकडे परत पाठवेल.  योग्य त्या दुरुस्तीसह दि. 17 ते दि.20 मार्च या कालावधीत आरक्षण आणि प्रारूप प्रभागरचना   खुली केली जाईल.