Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › ‘पलूस-कडेगाव’मध्ये भाजप ताकदीने लढणार

‘पलूस-कडेगाव’मध्ये भाजप ताकदीने लढणार

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 10 2018 11:59PMकडेगाव : वार्ताहर

पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक भाजप ताकदीने लढवेल, असे पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या उपस्थितीत शक्‍तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अजितराव घोरपडे, युवा नेते गोपीचंद पाडळकर, अतुल भोसले उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत खासदार पाटील म्हणाले, पक्षाच्या  आदेशानुसार ही पोटनिवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार आहोत. जिल्ह्याच्या राजकारणात निष्कलंक, निस्वार्थी युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले संग्रामसिंह देशमुख यांना चांगल्या मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

 पृथ्वीराज देशमुख म्हणाले, आजपर्यंत जिह्यात भाजप एकसंघ  आहे़. जिल्हा परिषद निवडणुकीत जसे यश मिळवले, तसेच या  पोटनिवडणुकीतही मिळवू. आमदार  नाईक म्हणाले,   ताकारी, टेंभू,म्हैसाळ आणि वाकुर्डे या योजनांना गती देण्यात  (स्व.) आमदार संपतराव देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता.आज त्यांचे चिरंजीव निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या पाठीशी जनतेने  खंबीरपणे उभे रहावे.

आमदार जगताप म्हणाले, संग्रामसिंह  यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून  जिल्ह्यात  सर्वसामान्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर अनेक कामे केली आहेत. त्यामुळे  येथील मतदारांनी  मोठ्या ताकतीने त्यांच्या पाठीशी उभे रहावे. आमदार खाडे म्हणाले, जिल्हा काँगे्रसमुक्त  करण्यासाठी सर्वांच्या ताकतीने पाठपुरावा सुरू आहे.या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात भाजपचा आणखी एक आमदार वाढणार आहे.आमदार गाडगीळ म्हणाले, जिल्हापरिषदेत संग्रामसिंह  यांनी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू केला आहे.सर्वसामान्यांसाठी विविध योजना त्यांनी राबविल्या आहेत.

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, 1995 मध्ये संपतराव देशमुख यांच्या रूपाने या तालुक्याला धडाधडीचे आमदार मिळाले होते.त्यांच्या काळात अनेक योजनांना गती मिळाली.परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर विरोधकांनी आमचे घराणे कायमस्वरूपी राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला.परंतु येथील मतदारांच्या जोरावर आम्ही जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठे परिवर्तन केले. आता या निवडणुकीत मतदारांनी पाठबळ द्यावे.

राजाराम गरूड यांनी प्रास्ताविक केले. अजितराव घोरपडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, गोपीचंद पडळकर,अतुल भोसले यांचीही भाषणे झाली. भाजपचे राज्य संघटक मकरंद देशपांडे, रवि अनासपुरे, दीपक शिंदे यांच्यासह मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनंजय देशमुख यांनी आभार मानले.