Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Sangli › राष्ट्रवादी इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादी इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 9:05PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी राष्ट्रवादी इच्छुकांनी सोमवारी दुसर्‍या दिवशीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. समर्थक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांमधील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. आता लक्ष उमेदवारीकडे लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार, बाबतही राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. 

सांगलीतील प्रभाग 9 ते 19 मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी झाल्या होत्या. सोमवारी कुपवाड आणि मिरजेतील प्रभाग 1 ते 8 आणि प्रभाग 20 मधील मुलाखती झाल्या. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, खादी ग्रामाद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, राहुल पवार, ताजुद्दीन तांबोळी, सागर घोडके, विनया पाठक, पद्माकर जगदाळे, धनपाल खोत, वंदना चंदनशिवे, जयश्री जाधव, मैनुद्दीन बागवान यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 

इच्छुकांमध्ये रस्सीखेच; मुलाखतीत दिसला सवतासुभा

राष्ट्रवादीमध्ये अनेक प्रभागात इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच आहे. उमेदवारीसाठी सर्वच इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आपलीच उमेदवारी कशी योग्य आहे हे उमेदवार स्वत: व समर्थकांच्या माध्यमातून नेत्यांपुढे मांडत होते. एकाच प्रभागातील इच्छुक उमेदवार एकत्रितपणे मुलाखतीला सामोरे न येता स्वतंत्रपणे येऊन शक्तिप्रदर्शन करण्याकडे कल दिसत होता. त्यामुळे इच्छुकांमधील सवतासुभा दिसत होता. राष्ट्रवादीच्या निवडणूक कार्यालयासमोर इच्छुक व समर्थकांची मोठी गर्दी होती. घोषणाबाजी सुरू होती. इच्छुकांच्या मुलाखतीने निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे.

तीन निवडणुकांत केवळ इच्छुकच

‘कुपवाडमध्ये राष्ट्रवादी रुजवली. गेली अठरा वर्षे पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीत आहे. राजकीय आणि सामाजिक योगदान देत आहे. गेल्या तीन निवडणुकात इच्छुक म्हणून मुलाखत दिलेली आहे. एकदाही उमेदवारी मिळालेली नाही. आता यावेळी मात्र उमेदवारी मिळालीच पाहिजे’, असे एका उमेदवाराने मुलाखतीवेळी सांगितले. 

गेल्यावेळी दोन; आता चार चाके

‘महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत दोन उमेदवार होते. नेत्यांनी दोन्ही चाके योग्य निवडली. विजय मिळाला. आता चार चाके आहेत. चारही चाके योग्य निवडा. विजय निश्‍चित होईल’, असे एका इच्छुक महिला उमेदवारांच्या पतीने मुलाखतीवेळी सांगितले. 

ऐनवेळी उमेदवारी जाहीर होणार

इच्छुकांच्या मुलाखतीचा टप्पा पूर्ण झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून सुरूवात होत आहे. उमेदवारी कोणाला मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार, याकडे इच्छुकांचे लक्ष   आहे. उमेदवारीवर निवडणुकीचे संदर्भ अवलंबून राहणार आहेत. अन्य काही पक्षांचे लक्ष नाराजांवर आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे संकेत आहेत.