Mon, Aug 19, 2019 05:07होमपेज › Sangli › ‘संभाव्य पूरस्थिती’: ७२ गावांसाठी आराखडा

‘संभाव्य पूरस्थिती’: ७२ गावांसाठी आराखडा

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 9:15PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात सन 2005-06 मधील कृष्णा, वारणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थितीतील धोके नजरेसमोर ठेवून जिल्हा परिषदेने यावर्षीही आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. मिरज, पलूस, वाळवा, शिराळा तालुक्यातील 72 गावांसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. 38 वैद्यकीय पथके सज्ज आहेत. 

जिल्हा परिषदेत मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व सर्व खातेप्रमुख तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर 5 व तालुकास्तरावर 10 वैद्यकीय पथकांचे नियोजन केले आहे. जिल्हा परिषदेत दि. 1 जून ते 31 ऑक्टोबर 2018 या  कालावधीसाठी साथ व पूर नियंत्रण कक्ष दूरध्वनी सेवा चोवीस तास कार्यरत करण्यात येत आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्या बैठक कक्षात पुरेशा प्रमाणात साथरोग प्रतिबंधक औषधाचे कीट, मेडीक्‍लोर द्रावण ठेवण्यात आले आहे. सर्पदंश, श्‍वानदंश प्रतिबंध लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध केला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचा टोल फ्री क्रमांक 102 आहे. त्यास अत्यावश्यक आरोग्य सेवा रुग्णवाहिका टोल फ्री नंबर 108 ची जोड दिली आहे. 

यामध्ये एएलएसच्या 19 व बीएलएसच्या 5 अशा एकूण 24 अत्याधुनिक व सुसज्ज अशा वातानुकुलित रुग्णवाहिकांचा समावेश आहे. पूरपरिस्थिती उद्भवल्यास अतिरिक्‍त मनुष्यबळाची व्यवस्था होणार आहे. 

सन 2005 च्या पूरस्थितीनुसार संभाव्य पूरग्रस्त गावे

मिरज तालुका : 13 गावे.  पलूस तालुका : 20 गावे.
वाळवा तालुका : 28 गावे.  शिराळा तालुका : 11 गावे. 
सन 2005-06 मध्ये ज्या गावांमध्ये पूरस्थिती होती अशा दोन ते तीन गावांमध्ये एक वैद्यकीय पथक या प्रमाणे 72गावांमध्ये 38 वैद्यकीय पथके तयार ठेवण्यात आली आहेत.