Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Sangli › महासभेत आरोग्य विभागाचे पोस्टमार्टेम

महासभेत आरोग्य विभागाचे पोस्टमार्टेम

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 12:12AMसांगली : प्रतिनिधी

कचरा उठाव नाही, नालेसफाईचा अद्याप अनेक ठिकाणी मुहूर्त नाही. ज्या डॉक्टरांवर वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली, ते कोणतेही काम करीत नाहीत. शहरातील महापालिकेचे दवाखाने डॉक्टरांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अशा तक्रारी करीत सदस्यांनी बुधवारी महासभेत आरोग्य विभागाचे पोस्टमार्टेम केले. चार-चार जणांवर जबादारी  विभागून देऊन अनागोंदी सुरू आहे. त्याऐवजी नालेसफाईसह सर्वच आरोग्य विभागाचा पदभार अखेर डॉ. सुनील आंबोळे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौर हारुण शिकलगार यांनी तसे आदेश दिले. 

कुपवाडमध्ये नालेसफाई नाही. पावसाळ्यात मुरुम नाही. पुन्हा पावसाने सगळीकडे पाणी तुंबल्यावर जाग येणार का, असा संतप्त सवाल विष्णू माने यांनी सभेत केला. सौ.  संगीता खोत, प्रशांत मजलेकर, विजय घाडगे, युवराज गायकवाड, प्रियंका बंडगर या सदस्यांनी नालेसफाईवरून आक्रमक पवित्रा घेतला.पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईचा मुहूर्त नाही.  नागरिकांच्या घरात नाल्यातील पाणी शिरते आहे. त्याला जबाबदार कोण, असा सर्वांनी प्रशासनाला जाब विचारला. यातूनच नालेसफाईची जबाबदारी नेमकी कोणत्या अधिकार्‍याची यावर चर्चा रंगली. 

कामगार अधिकारी चंद्रकांत आडके यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, डॉ. आंबोळे यांच्याकडे यापूर्वी सर्व पदभार होता. पण आयुक्तांनी तो काढून घेतला. त्याचे कारण विचारता अडके म्हणाले, डॉ. आंबोळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे कायद्याने त्यांच्याकडे आर्थिक अधिकार देता येत नाहीत. त्यासाठीच आयुक्‍तांनी  चार सहाय्यक वैद्यकीय अधिकार्‍यांना ही जबाबदारी वाटून दिली. याबाबत कायदेशीर अधिकार आहेत का, असा जाब किशोर जामदार यांनी विचारला. यावर उत्तर देताना अडके म्हणाले, पण ही पदे महापालिकेच्या आस्थापनेवर नाहीत. 

शेखर माने म्हणाले, डॉ. आंबोळे यांना आर्थिक अधिकार नाहीत. मग घनकचरा प्रकल्पातील वाहने, जेसीबी व इतर बाबी  खरेदीचा प्रस्ताव आंबोळेे यांच्याकडून कसे येतात? प्रशांत पाटील-मजलेकर म्हणाले, सहाय्यक वैद्यकीय अधिकार्‍यांचे काम दवाखाने सांभाळण्याचे आहे. पण ते नालेसफाई, कचरा उठावचे काम करीत आहेत.  दवाखान्यात वेळेवर डॉक्टरच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडील अधिकार काढून ते आंबोळेंना द्यावे, अशी मागणी केली.त्यानुसार शिकलगार यांनी तसे आदेश दिले.

दबाव काय असतो ते दाखवून देऊ : शिकलगार

नियमबाह्य कामासाठी पदाधिकारी, नगरसेवक दबाव टाकत असल्याचा आरोप आयुक्‍तांनी केला आहे. तोच धागा पकडून शेखर माने यांनी टोलेबाजी केली. ते म्हणाले, नागरिकांच्या कामांसाठी प्रशासनावर दबाव टाकण्यात गैर काय आहे?  चारही प्रभागातील कचरा उठाव, नालेसफाईसह सर्व जबाबदारी डॉ. आंबोळेंकडे द्यावी. तसा  ठराव  सर्वच सदस्यांच्या सहमतीने करण्यात यावा. तसा ठरावही करण्यात आला. पण मैनुद्दीन बागवान यांनी या ठरावाची अंमलबजावणी होणार का, असा सवाल केला. त्यावर महापौर शिकलगार म्हणाले, प्रशासन निश्चित अंमलबजावणी करेल. त्यासाठी दबाव काय असतो, ते यापुढे  आम्ही दाखवून देऊ.