Mon, Mar 18, 2019 19:24होमपेज › Sangli › कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊन तेढ टाळा

कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊन तेढ टाळा

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:49PMसांगली : प्रतिनिधी

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेले पोस्टर हटविणे आणि त्यासंदर्भात अधिकार्‍यांना झालेली मारहाण या विषयावरून महासभा गाजली. यावेळी महापौर हारुण शिकलगार यांच्यासह नगरसेवकांनी मध्यरात्री फलक हटविण्यावरूनही प्रशासनावर प्रश्‍नांचा भडिमार केला. कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा निषेधही करण्यात आला. पण अधिकार्‍यांनीही जातीय तेढ निर्माण होण्यासारखे वर्तन करू नये, असा पवित्रा सदस्यांनी घेतला.

येथील डॉ. आंबेडकरनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन  फलक हटविल्यावरून तणाव निर्माण झाला होता. त्यातून संतप्त कार्यर्त्यांकडून अधिकारी दिलीप घोरपडे यांना मारहाण झाली होती. यावर माजी महापौर विवेक कांबळे, स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, नगरसेवक शेखर माने यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला. 

गौतम पवार म्हणाले, देशभरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्याला विशेष महत्त्व आहे. सांगलीतही हा उत्साह  होता. असे असताना जयंतीच्या दिवशीच रात्री 2 वाजता डॉ. आंबेडकर यांचे डिजीटल फलक का हटवण्यात आले? अधिकार्‍यांनी समाजात तेढ निर्माण करण्याची सुपारी घेतली आहे का? कोणाचे आदेश होते आणि त्यातून विपरित घडले हे उघड आहे. त्यातूनच मनपाच्या अधिकार्‍यांना मारहाण झाली. त्याचेही समर्थन करता येणार नाही. मात्र, याप्रकरणी दलित कार्यकर्त्यांवरील गुन्हे महापालिकेने मागे घ्यावेत.

नगरसेवक शेखर माने म्हणाले, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर्षानुवर्षे साजरी होते. रात्री फलक काढण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? गेल्या महिन्यात शिवजयंतीवेळी फलक काढण्याचा प्रयत्न झाला होता. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम अधिकारी करीत आहेत. या अधिकार्‍यांचा हेतू तपासला पाहिजे.

विवेक कांबळे म्हणाले, सायंकाळी सहानंतर महापालिका कर्मचार्‍यांना कोणतेही काम करता येत नाही. तरीही मध्यरात्री दोनच्या सुमारास कर्मचारी फलक काढण्यासाठी गेले. त्यांना कोणी आदेश दिले होते? आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. जगन्नाथ ठोकळे म्हणाले, महापालिकेचे प्रशासन लोकशाहीत नव्हे; तर  मोगलाईत काम करीत आहे.

उपायुक्‍त सुनील पवार  म्हणाले, दिवसा फलक हटविताना तणाव निर्माण होत असल्याने रात्रीच फलक काढण्याचा निर्णय प्रशासनाच्या बैठकीत झाला होता. जे फलक काढण्याचा प्रयत्न झाला, त्याला परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने कर्मचार्‍यांनी तो निर्णय घेतला. पण पुन्हा तणावाचे वातावरण लक्षात घेता पुन्हा फलक लावले. पण मारहाणीचा प्रकार गंभीर आहे. 

Tags : sangli, Poster deletion issue, sangli news,