होमपेज › Sangli › जिल्ह्यात ७१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान 

जिल्ह्यात ७१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान 

Published On: May 27 2018 1:22AM | Last Updated: May 26 2018 11:31PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात   82  पैकी 11 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनिवरोध झाली आहे.  71 गावांच्या सार्वत्रिक आणि 37 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गावा-गावात जोरदार चुरस आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर आता उमेदवारांचा घरोघरी छुप्या प्रचारावर भर होता. मतमोजणी मंगळवारी  प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे.

जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला  होता. त्यापैकी  11 ठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली आहे.  त्यात कवठेमहांकाळ तालुक्यातील 3, आटपाडी- 4, शिराळा-2 आणि जत, कडेगाव तालुक्यातील प्रत्येकी एक गावांचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठीही उद्याच मतदान होत आहे.  त्यात मिरज तालुक्यातील 6, तासगाव 6, खानापूर 3, वाळवा 7, शिराळा 6, पलूस 3, आटपाडी 2, जत 7 आणि कडेगाव तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गावांतील 58 प्रभागात ही पोटनिवडणूक होत  आहे.  

सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत  मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 275 मतदान केंद्र तयार करण्यात आली असून 1 हजार 402 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कवठेमहांकाळ, शिराळा आणि आटपाडी तालुक्यात अधिक गावांत ही निवडणूक होत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात खासदार संजय  पाटील, आमदार सुमनताई पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी  या निवडणकू प्रचारात सहभाग घेतला होता. शिराळा तालुक्यात आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे नेते सत्यजीत देशमुख यांनीही लक्ष घातले  आहे.

ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक मुद्दे आणि उमेदवार यांच्यावर अवलंबून असते. त्यामुळे बहुसंख्य ठिकाणी वेगवेगळ्या आघाड्या झाल्या आहेत.  विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. आपले उमेदवार जास्तीत- जास्त निवडून यावेत आणि ग्रामपंचायती आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.