Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Sangli › राजकारणाच्या रोजगारामुळे सांगली-मिरज बेरोजगार!

राजकारणाच्या रोजगारामुळे सांगली-मिरज बेरोजगार!

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 9:58PMसांगली : सुनील कदम

महापालिकेच्या भूतकाळात डोकावून बघितले तर असे दिसते की,  पाच वर्षांपूर्वी, दहा वर्षांपूर्वी, पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी भलेही वेगवेगळे असतील, पण आरोप-प्रत्यारोप हेच होते आणि देण्यात आलेली आश्‍वासनेही तीच तीच आहेत. महत्वाचे म्हणजे या शहराची मूळ दुखणी मात्र कायम आहेत.

गेल्या काही वर्षांत या शहरात झालेल्या राजकारणाच्या रोजगारात खरा रोजगार हरवलाय. राजकारणाच्या बाजारात सातासमुद्रापार लौकिक असलेली इथली बाजारपेठ हरवली आहे. सगळी मंडळी राजकीय उद्योगात मग्न असल्यामुळे या शहराचा औद्योगिक विकास खुंटलाय. गेल्या काही वर्षांमध्ये या नाट्यपंढरीत विकासकामांऐवजी राजकीय नाटकेच जास्त रंगताना दिसत आहेत. या मूळ दुखण्यांवर जोपर्यंत रामबाण इलाज होत नाही, तोपर्यंत या शहराचा विकास तोळामासाच राहणार, यात शंका नाही.

(स्व.) वसंतदादा पाटील यांच्यानंतर या शहराला विकासाची दूरदृष्टी असलेला नेताच लाभला नाही, हे या शहराचेच नव्हे तर अवघ्या जिल्ह्याचे एक मोठे दुखणे आहे. दादांच्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा आली त्या मंडळींनी राजकारणाचा नुसता पोरखेळ करून टाकला. दादांच्या नंतर नेतृत्वाची कमान ज्यांच्या ज्यांच्या हातात आली त्या नेत्यांना संधी मिळाली नाही अशातला भाग नाही. दादांच्या नंतर केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नेतृत्व करायची संधी या जिल्ह्यातील नेत्यांना अनेकवेळा लाभली, पण बहुतेकांनी आपापल्या ‘परगण्याच्या’ विकासातच धन्यता मानली आणि बिचारी सांगली विकासाच्या बाबतीत नेहमीच पोरकी राहिली. सांगलीच्या विकासाच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत वेगवेगळे राजकीय खेळ रंगविले गेले, पण राजकीय मतलब साधल्यावर सांगलीच्या विकासाचा मुद्दा कुणाच्याच स्मरणात राहिला नाही.

एकेकाळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा केवळ देशातच नव्हे ;तर अन्य राज्यात आणि पार सातासमुद्रापार लौकिक होता. जगभरातील हळदीचे दर एकेकाळी सांगलीतून ठरत होते, असे सांगितले तर आज कुणी त्यावर विश्‍वास ठेवणार नाही, पण ती वस्तुस्थिती आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूतून शेतकरी आपला शेतीमाल घेऊन सांगलीत येत होते. आज या बाजारपेठेची  पार रया गेलेली दिसते. इथल्या राजकीय साठमारीमुळे आज ही बाजारपेठ कर्नाटकात स्थलांतरीत होताना दिसते आहे. पण राजकारणाचा बाजार मांडून बसलेल्या मंडळींना त्याचे भान आलेले दिसत नाही.

वसंतदादा पाटील यांनी अतिशय नियोजनबध्द पध्दतीने इथल्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यामुळे सहकारी सूतगिरणी, वसंतदादा सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार उपलब्ध झाला होता. माधवनगर, मराठे, बालाजी, वेलणकर या कापड गिरण्यांसह  औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून औद्योगीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली होती. पण गेल्या काही वर्षांत या शहराचा औद्योगिक विकास ठप्प झाला आहे. 

ज्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यामुळे सांगलीच्या औद्योगिक विकासाचा पाया रचला. तो साखर कारखाना दहा-दहा वर्षे बंद राहतो, हे दादांच्यानंतर नेतृत्व करणार्‍या जिल्ह्यातील नेत्यांच्या नाकर्तेपणाचे फळ म्हणावे लागेल.आज नवीन उद्योगांची उभारणी तर दूरच, उलट आहेत ते उद्योगधंदे भंगारात निघत चालले आहेत. त्यामुळे या शहरातील युवापिढीला आज रोजगारांच्या शोधात अन्य शहरांमध्ये भटकावे लागत आहे. पार दिल्ली दरबारी आपले राजकीय वजन राखून असलेले काही नेते या शहराने आणि जिल्ह्याने दिले. आपल्या या राजकीय वजनाचा वापर करून या लोकांना काही मोठे उद्योग-व्यवसाय सांगली परिसरात आणणे सहज शक्य होते. मात्र कधीही तसे प्रयत्न झालेले दिसले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून आज या शहराच्या गल्लीबोळात बेरोजगारांचे तांडे फिरताना दिसत आहेत. देशभर आपला नावलौकिक असलेल्या काही शिक्षण संस्था या शहरात असताना त्याच संस्थांमधील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी अन्यत्र जावे लागते, हे या नगरीचे दुर्दैव आणि इथल्या राजकीय नेत्यांचे अपयश आहे.

हाकेच्या अंतरावरून कृष्णा आणि वारणा या दोन-दोन नद्या वाहत असताना   या शहरातील लोकांना पुरेसे आणि शुध्द पाणी मिळत नसेल तर इथल्या नेतृत्वाच्या नावाने कपाळावर हात मारून घेतलेलाच बरा. इथल्या पाण्याच्या आणि शेरीनाल्याच्या कृपेने आजवर कितीजणांनी आपापले ‘राजकीय संध्यास्नान’ उरकून घेतले आहे, ते या शहरातील जनता पुरती जाणून आहे. मात्र इतक्या वर्षानंतर आजही पाण्याच्या प्रश्‍नावरून रंगणारे इथले राजकारण बघितल्यावर या बाबतीतील नेत्यांची निष्क्रियता आपोआपच चव्हाट्यावर टांगली गेल्याशिवाय राहत नाही. 

आजकाल सांगलीचे पाणी इतके बदनाम झाले आहे की घरी आलेला पाहुणासुध्दा हाती दिलेल्या पाण्याच्या तांब्यातील पाण्याचा घोट न घेताच काढता पाय घेतो. तरीदेखील पाण्याच्या नावाने आश्‍वासने देण्याचा खेळ काही थांबलेला दिसत नाही.

शासन दरबारी असलेल्या कागदोपत्री तरी सांगली आणि मिरज ही दोन शहरे पर्यटनाच्या नकाशावर आहेत. मात्र पर्यटकांनी आकर्षित व्हावे असे या शहरांमध्ये काय आहे? पर्यटनस्थळांच्या नावावर उभी राहिलेली काही नेत्यांची हॉटेल्स सोडली तर बाकी नवीन काहीच दिसत नाही. या शहरात एखादा सुंदर बागबगीचा नाही, की साधा पोहण्याचा तलाव नाही. नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या शहरात एखादे  सुसज्ज नाट्यगृह नाही. ही एकच बाबसुध्दा महापालिकेच्या आजपर्यंतच्या कारभार्‍यांच्या राजकीय नाटकांवर भाष्य करायला पुरेशी बोलकी आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेत काही ठराविक मंडळी तळ ठोकून बसलेली दिसतात. शहरविकासाच्या गप्पा मारण्यात ही मंडळी बरीच पटाईत आहेत. पण त्यांच्या कारकिर्दीत या शहराचा किती विकास झाला आणि त्यांचा स्वत:चा किती विकास झाला, हे उघड्या डोळ्यांनी दिसणारे सत्य आहे. असे असताना पुन्हा पुन्हा तीच तीच मंडळी आश्‍वासनांचे तेच तेच फुगे सोडताना दिसत आहेत. 

निवडणुकीच्या निमित्ताने जवळपास सर्वच पक्षांचे  जाहीरनामे बघितले तर असे दिसते की, बहुतेकांनी गेल्या निवडणुकीवेळी दिलेली आश्‍वासनेच यावेळी थोडी आलटून- पालटून दिली आहेत.विशेष म्हणजे बहुतांश मंडळीसुध्दा तीच आहेत, बदल फक्त एवढाच दिसतोय की, त्यापैकी काही काल इकडे दिसत होते आणि आज तिकडे दिसतात. तीच मंडळी, तीच आश्‍वासनं घेऊन आज दारोदार मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. यात बदल करायची ताकद आहे ती फक्त मतदारांच्या मनगटात. मतदारांनी ती ताकद वापरली तर कदाचित या शहरातील जनतेला अपेक्षित असलेली विकासाची पहाट उजडायला वेळ लागणार नाही.

सारासार विवेकबुद्धी वापरण्याची गरज!

या निवडणुकीच्या निमित्ताने जवळपास सगळेच राजकीय पक्ष मतदारांना सामोरे जात आहे. पॅनेल पध्दतीने होत असलेल्या या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला चार नगरसेवक निवडण्याचा हक्क आहे. अनेकवेळा मतदार वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या विचारधारेशी मानसिकदृष्ट्या जोडले गेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडून एकाच पक्षाच्या उमेदवारांना किंवा पॅनेलला मतदान होते. त्यामुळे ‘उडदामाजी  काळे गोरे’ या न्यायाने सरसकट लोक निवडून जातात. पण या निवडणुकीत मतदारांनी  आपापले पक्षीय प्रेम बाजूला ठेवून ‘कर भला सो हो भला’ या उक्तीनुसार जो खरोखरच ‘भला’ आहे, त्याच्या पदरात आपले दान टाकले तरच या शहराला विकासाच्या मार्गाने नेणारे कारभारी लाभतील. त्यामुळे मतदारांनी आपली सारासार विवेकबुध्दी वापरून मतदान करण्याची गरज आहे.

राजकारणाला गुन्हेगारांचे ‘ग्रहण’...

गेल्या काही वर्षात या शहराच्या राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण. इथल्या राजकारण्यांचा आणि गुन्हेगारांचा कधीही संबंध नव्हता अशातला भाग नाही. मात्र कधीकाळी, अगदी अधून मधून गुन्हेगारांची ही पिलावळ त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी राजकारण्यांच्या वळचणीला दिसायची. मात्र गेल्या काही वर्षात ही मंडळी आता थेट राजकारणातच उतरलेली दिसतायत. आज  पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या नावावरून जरी नजर फिरवली तरी किती मोठ्या प्रमाणात या  राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे ते स्पष्ट होते. असल्या या ‘भुतांच्या मुखातून विकासाच्या भागवताचं पारायण’ होईल, अशी आशा बाळगणे हे शहाणपणाचं ठरणार नाही. त्यामुळे आता त्यांना काय ‘उतारा’ द्यायचा त्याचा निर्णय मतदारांनाच घ्यावा लागणार आहे. अन्यथा भविष्यात ही भुते या शहराच्या अवघ्या  विकासालाच झपाटून सोडतील.