Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Sangli › राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींना ग्रामसभेला बॅन

राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींना ग्रामसभेला बॅन

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 11:13PMसांगली : प्रतिनिधी

प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा अभियानांतर्गत सोमवारी आयुष्यमान भारत या उपक्रमांतर्गत ग्रामसभा होणार आहेत. मात्र या ग्रामसभांना राजकीय पक्ष किंवा लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहता येणार नाही. कोणत्याही प्रकारे मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करू नये, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 

राज्यातील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व 1812 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाच्या राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शन पाठविले आहे. 

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा अभियान हा राष्ट्रव्यापी कार्यक्रम आहे. जनतेच्या आरोग्याशी संबंधित आहे. यामध्ये राज्यातील 83 लाख लाभार्थींचा समावेश आहे. जुन्या लाभार्थींची माहिती अद्यावत करण्यात येणार असल्याने दि. 30 एप्रिल 2018 रोजी होणार्‍या ग्रामसभांमध्ये राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहू नये. कोणत्याही प्रकारे मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती करू नये या अटीच्या अधीन राहून दि. 30 एप्रिल 2014 रोजी राज्यभर ग्रामसभा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे’, असे मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोगाने पाठविले आहे. 

सांगली जिल्ह्यात 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर 40 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका आहेत. शिवाय पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही गुरूवारी जाहीर झाली आहे. त्याची आचारसंहिता जिल्हाभर लागू झाली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन पाहता सोमवारी होणार्‍या ग्रामसभेपासून राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींना ग्रामसभेपासून दूर रहावे लागणार आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा अभियानअंतर्गत ‘आयुष्यमान भारत’ ही योजना राबविली जाणार आहे. सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षण यादीतील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  मुल, नवीन विवाहिता यांचे नाव या यादीत समाविष्ट करता येणार आहे. 

Tags : sangli, sangli news, Political parties, people representatives, Gramsabha Ban,