Thu, Jun 27, 2019 02:05होमपेज › Sangli › पोलिसाचा निर्घृण खून

पोलिसाचा निर्घृण खून

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 19 2018 12:17AMसांगली : प्रतिनिधी

दारूच्या बिलावरून झालेल्या वादातून गणवेशातील एका वाहतूक पोलिसाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. समाधान महादेव मांटे (वय 29, रा. पोलिस वसाहत, मूळ रा. देऊळगाव, जि. बुलढाणा) असे मृत पोलिसाचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेल रत्ना डिलक्सच्या समोर ही घटना घडली. याप्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. तर मुख्य संशयित झाकीर जमादार गायब झाला आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

राजू ऊर्फ अख्तर नदाफ (वय 29), अन्सार अजिज पठाण (30, दोघेही रा. हडको कॉलनी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. समाधान मांटे मिरज शहर पोलिस ठाण्याकडे कार्यरत होते. तेथून त्यांची प्रतिनियुक्‍तीवर वाहतूक शाखेकडे बदली झाली होती. ते सध्या विश्रामबाग येथील पोलिस वसाहतीत पत्नी, मुलासमवेत राहत होते. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुख्य संशयित झाकीर हॉटेल रत्ना डिलक्स येथे काऊंटरवर दारू पीत उभा होता. रात्री पावणेअकराच्या सुमारास मांटेही तेथे दारू पिण्यासाठी गेले होते. दोघेही शेजारीच उभे होते. यावेळी मांटे यांनी   सोडा घेतला आहे, असे समजून हॉटेलमधील एका वेटरने एका बाटलीतील सोडा घेतला व प्याला. हे पाहिल्यानंतर झाकीरने त्या वेटरला शिवीगाळ केली. त्यावेळी मांटे यांनी झाकीरला हटकले. ‘वेटरने सोडा पिला तर पिऊ दे. त्याचे बिल माझ्या बिलात लाव’ असे त्यांनी झाकीरला म्हटले. 

मांटे यांच्या या वक्‍तव्याचा झाकीरला राग आला. मांटे व झाकीर यांच्यात वादावादी झाली. त्यातून मांटे यांनी झाकीरच्या कानशिलात लगावल्या. नंतर त्यांना बघून घेण्याची धमकी देत झाकीर तेथून निघून गेला. ही घटना घडल्यानंतर मांटे हॉटेलबाहेर तेथील व्यवस्थापकाशी बोलत थांबले होते. साडेअकराच्या सुमारास झाकीर, राजू नदाफ आणि अन्सार पठाण यांच्यासोबत पुन्हा हॉटेलसमोर आला. त्याने खिशातून आणलेले धारदार शस्त्र दाखवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र त्याने बेभानपणे मांटे यांच्यावर सपासप अकरा वार केले. यामध्ये त्यांची छाती, पोट आणि पाठीवर वर्मी घाव बसले.  अति रक्‍तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर तो साथीदारांसमवेत पसार झाला. 

वाहतूक नियंत्रक पोलिसाचा खून झाल्याची बातमी समजताच पोलिस दलात खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक शशिकांत बोराटे, मिरजेचे उपअधीक्षक धीरज पाटील, सांगलीचे उपअधीक्षक अशोक वीरकर, पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, रविंद्र डोंगरे, रमेश भिंगारदेवे घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अधीक्षक शर्मा यांनी तातडीने तपासाबाबत अधिकार्‍यांना सूचना दिल्या.पंचनामा करून मृतदेह सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलविला. बुधवारी दुपारी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे अधिक तपास करीत आहेत. 

पोलिस दलात हळहळ

मांटे रात्रीची नाकाबंदीची ड्युटी संपवून  सांगलीत आले होते. त्यांच्या खुनामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्‍त होत आहे. 

हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

मांटे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये हॉटेलचा व्यवस्थापक आणि वेटरही तेथे असल्याचे दिसून येतात. मात्र, त्यातील कोणीही हल्लेखोराला प्रतिकार केला नाही. सीसीटीव्ही फुटेजवरूनच एलसीबीने झाकीरच्या दोन साथीदारांना अटक केली. 

हॉटेलचालकाला वाचविण्याचा प्रयत्न

दरम्यान, रत्ना डिलक्स हॉटेलच्या आवारात ही घटना घडली. हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये याचे चित्रणही रेकॉर्ड झाले आहे. त्यामध्ये हॉटेलच्या गेटमध्ये येऊन झाकीरने मांटे यांच्यावर वार केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तरीही पोलिसांनी हॉटेलच्या समोर असलेल्या फुटपाथवर ही घटना घडल्याचा पंचनामा केला आहे. शिवाय, हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याची वेळ रात्री पावणेबाराची असताना पोलिसांच्या दप्तरी अकरा ते साडेअकरा दरम्यान ही घटना घडल्याची नोंद आहे.