Thu, Jun 27, 2019 16:15होमपेज › Sangli › पोलिसाचा खून; दोन अधिकारी निलंबित 

पोलिसाचा खून; दोन अधिकारी निलंबित 

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 20 2018 12:20AMसांगली : प्रतिनिधी

येथील न्यू रत्ना डिलक्स हॉटेल समोर वाहतूक पोलिस समाधान मांटे यांच्या खूनप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश भिंगारदिवे आणि राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक गणेश गुरव यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्याशिवाय हॉटेल सील करून परवाना रद्द करण्यात आला आहे. ही माहिती राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

मांटे  मंगळवारी रात्री हॉटेल रत्ना डिलक्स येथे दारू पिण्यासाठी गेले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित झाकीर जमादार हा काऊंटरवर दारू पीत उभा होता. मांटे व झाकीर यांच्यात बिलाच्या कारणावरून वादावादी झाली. काही वेळानंतर  झाकीर हा राजू नदाफ आणि अन्सार पठाण यांच्यासोबत पुन्हा हॉटेलसमोर आला.   मांटे यांच्यावर चाकूचे सपासप वार करण्यात आले.   यामध्ये मांटे यांचा जागीच मृत्यू झाला. 

निवडणूक आयुक्‍त सहारिया आज  महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथे आले होते. त्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी उपस्थित होते.श्री. सहारिया म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे पालन करण्यात कुणीही कचुराई केल्यास त्याचे आधी निलंबन केले जाईल आणि मग चौकशी होईल.    पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदिवे, उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक गणेश गुरव यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. भविष्यात रात्री हॉटेल, ढाबे, बार चालू राहणार नाहीत. तसे झाल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही.  

ते म्हणाले, ही निवडणूक निर्भय आणि पारदर्शक होईल. त्यासाठी 48 जणांना तडीपार करण्यात आले आहे. बारा जणांवर एनपीडीएनुसार कारवाई करण्यात आली आहे. तीस लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अनेकजणांच्याकडून वर्तनुकीविषयीचे बाँड लिहून घेतले आहेत. उमेदवारांना खर्चाची मर्यादा पाच लाख रुपये आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी   चार आयकर अधिकारी नियुक्त केले आहेत. मोफत वस्तू, दारू, जेवनावळी घालण्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.” 

मतदानात 12 ते 15 टक्के वाढ होईल : सहारिया

श्री. सहारिया म्हणाले, निवडणुकीसाठी आवश्यक  ती सर्व  कार्यवाही पूर्ण झाली आहे. मतदान यंत्रे, त्यासाठी लागणारी वाहने, मनुष्यबळाची पूर्तता सुरू आहे. प्रशिक्षणाचा एक टप्पा झाला आहे. गेल्यावेळी 63 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाच्या दिवशी सुदैवाने मोठा पाऊस झाला नाही तर त्यात 12 ते 15 टक्क्यांनी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.