Thu, Jun 27, 2019 18:09होमपेज › Sangli › पोलिस पत्नीसह तिघींचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिस पत्नीसह तिघींचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 10:58PMसांगली : प्रतिनिधी

येथील शहर पोलिस ठाण्यासमोर पोलिस पत्नीसह तीन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेथील महिला पोलिसांनी त्यांना तातडीने अडवून ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. शनिवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पतीवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान त्या दोघींवरही आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस पत्नी सीमा आकाश दबडे (रा. विश्रामबाग पोलिस लाईन), जबीन अझरूद्दीन शेख (वय 24), मेहराज उस्मान शेख (वय 65, दोघीही रा. गणेशनगर) अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या महिलांची नावे आहेत. 

एका महिलेने निलंबित पोलिस आकाश दबडेसह महापालिकेचे निलंबित स्वच्छता निरिक्षक श्रीकांत वासुदेव वलसे-मद्रासी (वय 41, रा. हरिपूर रस्ता), संतोष मुळे, सरोजा हेगडे, अझरुद्दीन उस्मान टीनमेकर-शेख (वय 29, रा. गणेशनगर), बाळू रणदिवे, सदाशिव निलवनी, अनिल कांबळे यांच्याविरोधात बलात्काराची फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेख आणि मद्रासी  यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सोमवार(दि. 26) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

याप्रकरणी सीमा दबडे यांनी पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक यांना शुक्रवारी बलात्काराचा आरोप खोटा असल्याचे निवेदन दिले होते.  मुलांसह पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारही दिला होता. 

दरम्यान शनिवारी दलित महासंघातर्फे बलात्काराची खोटी तक्रार दिल्याच्या निषेधार्थ शहर पोलिस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाची सुरूवात झाली. पावणेबाराच्या सुमारास मोर्चा शहर पोलिस ठाण्याजवळ आला. त्यावेळी तिघींनीही अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेथील महिला पोलिसांनी तातडीने हालचाल करून त्यांच्या हातातील रॉकेलची बाटली काढून घेतल्याने अनर्थ टळला.