Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Sangli › आटपाडीत ५ हजारांची लाच घेताना पोलिसाला अटक

आटपाडीत ५ हजारांची लाच घेताना पोलिसाला अटक

Published On: May 05 2018 1:46AM | Last Updated: May 05 2018 1:40AMसांगली : प्रतिनिधी

आटपाडीत पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो, असे सांगून पाच हजारांची लाच स्वीकारताना पोलिस नाईकला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. अर्जुन बाबू घोदे (वय 32, रा. आटपाडी, मूळ रा. व्हसपेठ, ता. जत) असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याबाबत रात्री उशिरा आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

तक्रारदाराच्या भावासह बहिणीविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात त्यांना अटकही करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास घोदे करीत आहेत. त्या दोघांनाही न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो, असे सांगून घोदे यांनी गुरुवारीतक्रारदाराकडे पाच हजार रूपये लाचेची मागणी केली.  त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयात संपर्क साधून याबाबत तक्रार दिली. 

त्यानंतर शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकार्‍यांनी या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर घोदे यांनी पाच हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी लाच स्विकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. घोदे यांच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.