Tue, Nov 13, 2018 10:07



होमपेज › Sangli › पोलिसपुत्राला अटक

पोलिसपुत्राला अटक

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:57PM

बुकमार्क करा





सांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार तरुणांची फसवणूक करणार्‍या पोलिसपुत्रास बुधवारी सायंकाळी त्याच्या घरातून अटक करण्यात आली. कौस्तुभ सदानंद पवार (रा. वसंतनगर, कुपवाड) असे त्याचे नाव आहे. 

सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित एजंट धीरज बाळासाहेब पाटील (रा. पाटणे प्लॉट, सांगली)  हा अद्याप गायब आहे. 

याप्रकरणी पेठ (ता. वाळवा) येथील नामदेव कुंभार यांनी 5 डिसेंबरला फिर्याद दिली होती. दरम्यान, त्या चारही तरुणांच्या बेकायदा वास्तव्याबाबत मंगळवारीच मलेशियन न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये त्यांना तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मलेशियन पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर लगेचच पोलिसपुत्र कौस्तुभ गायब झाला होता. सांगली शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एक विशेष पथक त्याचा शोध घेत होते. 

आज सायंकाळी कौस्तुभ घरी येणार असल्याची माहिती निरीक्षक शेळके यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक समीर चव्हाण यांना कारवाईचे आदेश दिले. चव्हाण यांनी सायंकाळी सातच्या सुमारास त्याच्या कुपवाड येथील घरावर छापा मारून त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

नामदेव कुंभार यांचा मेहुणा गुरुनाथ इरण्णा कुंभार (रा. शिरवळ, ता. अक्कलकोट), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवडी, जि. अहमदनगर), दीपक माने (रा. हुन्नर, जि. सोलापूर), समाधान धनगर (रा. जवळगाव) या चौघांसह एकूण 15 युवकांना प्रत्येकी दीड लाख रूपये घेऊन मलेशियाला पाठविले होते. मात्र यातील चौघांना वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियन पोलिसांनी अटक केली होती.   

त्यानंतर या युवकांच्या कुटुंबियांनी याबाबत फोनवरून कौस्तुभ पवारकडे चौकशी केली. मात्र तो त्यांना उत्तरे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यानंतर 13 नोव्हेंबरला कौस्तुभने गुरूनाथसह चौघांना इमिग्रेशन कार्यालयात चौकशीसाठी नेल्याचे फोनवरून सांगितले. तसेच चौकशी करून त्यांना सोडून देतील असे सांगितले. मात्र पोलिसांनी वर्किंग व्हिसा नसल्याने चौघांनाही तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता तर त्यांना शिक्षाही झाली आहे. पोलिसपुत्र कौस्तुभ पवारला अटक झाल्याने युवकांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.