होमपेज › Sangli › पोलिसपुत्राला सात दिवस कोठडी

पोलिसपुत्राला सात दिवस कोठडी

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:52PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरी देण्याचे आमिष दाखवून चार तरुणांची फसवणूक करणार्‍या पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याला बुधवारी अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यातील दुसरा संशयित एजंट धीरज पाटील अद्याप गायब आहे. 

याप्रकरणी पेठ (ता. वाळवा) येथील नामदेव कुंभार यांनी दि.5 डिसेंबरला फिर्याद दिली होती.दरम्यान त्या चारही तरुणानां बेकायदा वास्तव्याबाबत मलेशियातील न्यायालयात तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मलेशियन पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर लगेचच पोलिसपुत्र कौस्तुभ गायब झाला होता. सांगली शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर  विशेष पथक त्याचा शोध घेत होते. 

बुधवारी त्याला अटक करण्यात आली. नामदेव कुंभार यांचा मेहुणा गुरुनाथ कुंभार, मोहन शिंदे, दीपक माने, समाधान धनगर या चौघांसह एकूण 15 युवकांना प्रत्येकी दीड लाख रुपये घेऊन मलेशियाला पाठविले होते. मात्र, यातील चौघांना वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियन पोलिसांनी अटक केली होती.   

त्यानंतर या युवकांच्या कुटुंबीयांनी याबाबत फोनवरून कौस्तुभ पवारकडे चौकशी केली. मात्र तो त्यांना उत्तरे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यानंतर दि.13 नोव्हेंबरला कौस्तुभने गुरूनाथसह चौघांना इमिग्रेशन कार्यालयात चौकशीसाठी नेल्याचे फोनवरून सांगितले. तसेच चौकशी करून त्यांना सोडून देतील असे सांगितले. नंतर मात्र, कौस्तुभने मोबाईलच बंद केला. त्यामुळे त्याच्यासह धीरज पाटील विरोधात कुंभार यांनी फिर्याद दिली होती. 

दरम्यान कौस्तुभ पवारने आणखी किती युवकांची फसवणूक केली आहे याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले. मलेशियात नोकरीच्या आमिषाने आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रारदारांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.